पालम : पेठशिवणीचा पशुधन बाजार महाराष्ट्रात नावलौकिक मिळविणार असल्याचे प्रतिपादन, पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांनी केले.
पेठशिवणी येथे दि.३१ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठशिवणी व गावकरी मंडळी यांच्या पुढाकाराने पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोमवारी पशुधन आठवडी बाजारांचा शुभारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानोबा वाघमारे, उद्घाटक पालम तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे, प्रमुख पाहुणे पालम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे, पालम पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पेठशिवणी पशुवैद्यकीय अधिकारी बाळासाहेब डाखोरे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव भस्के, नायब तहसीलदार तेलभरे, उपसरपंच शिवाजीराव वाडेवाले, मंडळ अधिकारी स्मिता बोंडारे, पोलीस बीट जमादार कोलमवार, ग्रामविकास अधिकारी संजीवनी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर तहसीलदार वाघमारे यांच्या हस्ते बैलजोडी पूजनाने व श्रीफळ फोडून पशुधन आठवडी बाजाराचा शुभारंभ करण्यात आल्याचे जाहीर केले. या वेळी शिसोदे, पो.नि.थोरात, नायब तहसीलदार तेलभरे, उत्तमराव भस्के यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजारात पशुधन आणलेल्या पशुपालक- व्यापारी बांधवाचा टोपी व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक पत्रकार भगवान करंजे यांनी मांडले. पेठशिवणी पशुधन पहिल्याच बाजारात ऐंशी लाख रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा पशुपालक व्यापारी वर्गातून ऐकायला मिळाली.