पिंपरी : आई-वडिलांचा सांभाळ म्हणजे संस्कृती, ममता आणि जबाबदारी यांचे प्रतीक असते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वर्तमान दृश्य काहीसे धक्कादायक दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील २२४ ज्येष्ठ नागरिकांनी मुले आमचा सांभाळ करत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी हवेली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल केल्या आहेत.
‘मुलं आम्हाला विचारत नाहीत, घरात आमचं स्थान उरलं नाही. आता शासनाकडे दाद मागण्यावाचून पर्याय नाही,’ असे काही ज्येष्ठ नागरिक अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगत आहेत. अशा तक्रारींची संख्या दरवर्षी वाढत आहे. आर्थिक सुरक्षा, सन्मानाने जीवन जगण्यासाठी आणि मालमत्तेस संरक्षण हवे, यासाठी पालकांकडून शासनाकडे दाद मागितली जात आहे. यासाठी शहरातील २२४ ज्येष्ठांकडून पोटगीसाठी प्रांताधिका-यांकडे अर्ज करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, अर्ज करणा-या पालकांमध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील आणि आयटी क्षेत्रात कार्यरत उच्च पगारदार मुलांच्या पालकांचे प्रमाण मोठे आहे. कष्टाने उभ्या केलेल्या संसारातील आई-वडिलांना आता त्यांच्या मुलांकडूनच ‘निर्वाह खर्च’ मागावा लागत आहे.