रोम : कॅथलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराची रिहर्सल सुरू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनच्या म्हणण्यानुसार, पोप यांनी स्वत: सांगितले आहे की न्यूमोनियापासून वाचण्याची कोणतीही आशा नाही. हे वृत्त समोर आल्यानंतर स्विस गार्डच्या प्रवक्त्याने याला अफवा ठरवत ते त्यांच्या नेहमीच्या नित्यक्रमानुसार काम करत असल्याचे सांगितले. ८८ वर्षीय पोप फ्रान्सिस यांना न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यापासून रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
व्हॅटिकनमधील सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेतली जात आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पोप यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. दोघांमध्ये सुमारे २० मिनिटे भेट झाली. मेलोनी यांनी सांगितले की, पोप यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत असून त्यांच्या चेह-यावर हास्य आहे. पोप फ्रान्सिस हे गेल्या १,००० वर्षांतील पहिले व्यक्ती आहेत जे नॉन-युरोपियन असूनही कॅथलिक धर्मातील सर्वोच्च पदावर पोहोचले आहेत.