बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरातच एका पोलिस कर्मचा-याला गांजा ओढताना पकडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी संबंधित कर्मचा-यावर तातडीने कारवाई करत थेट निलंबनाची शिक्षा केली आहे. पोलिस दलाच्या शिस्तीला आणि प्रतिमेला धक्का पोचवणा-या या प्रकारामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या डागडुजीचे काम सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी काल नवनीत काँवत त्यांच्या कुटुंबियांसोबत निवासस्थानी गेले होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी बाळू बहिरवाळ घराच्या आतमध्ये गांजा ओढत होते. नवनीत काँवत यांनी घराची बेल वाजवली पण बाळू बहिरवाळ यांनी गेट उघडले नाही. काही वेळानंतर त्यांनी गेट उघडले. नवनीत काँवत यांनी घरात प्रवेश केला. पण त्यावेळी त्यांना गांजाचा वास आला.
पोलिस अधीक्षकांच्या घरातच असा गांजाचा वास आल्यामुळे नवनीत काँवत यांनी संबंधित पोलिस कर्मचा-याची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. तपासणी अहवालात कर्मचा-याने गांजा पिल्याचे निष्पन्न झाले. त्याची दखल घेत काँवत यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. त्याचवेळी बाळू बहिरवाळ यांचे निलंबनही करण्यात आले.