लातूर : प्रतिनिधी
जागतिक ध्यान दिनानिमित्त सनराईज योगा केंद्रातर्फे बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात दि. २१ डिसेंबर रोजी झालेल्या मेडिटेशन शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. या जगातील पहिल्या जागतिक मेडिटेशन ध्यान दिवसाच्या आयोजनात भारत सह प्रायोजक आहे. सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थेच्या संचालिका नंदिनी पडिले व त्यांच्या सनराइज योगा स्टुडिओमधील अनेक महिला सदस्या यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर शनिवारी जवळपास नऊशे पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे मेडिटेशन घेतले.
यावेळी सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नंदिनी पडिले म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण दररोज स्वत:साठी एक ते दीड तास देणे खूप गरजेचे आहे. नुसता शारीरिक व्यायाम करुन भागणार नाही, तर आपल्याला ध्यान मेडिटेशन करून आपल्या आंतरिक शांतीचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी आज पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त आपण हजारोंच्या संख्येने सहभागी झालात ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे.
ध्यान मेडिटेशन शिबिराचे आयोजक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक आर.आर. सय्यद, संजय राजुळे, तर सनराइज योगा स्टुडिओच्या महिला पोलीस सदस्या सुषमा राजे, भाग्यश्री पडिले, सुजाता कसपटे, रेणुका कोळी, श्वेता नामवाड, सारीका सीमंतकर, महादेवी गुजर, सुवर्णा कोरे सहभागी झाल्या होत्या.