30.6 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeमहाराष्ट्रप्रियकराने प्रेयसीचा खून करत केली आत्महत्या

प्रियकराने प्रेयसीचा खून करत केली आत्महत्या

छ. संभाजीनगर येथील धक्कादायक घटना

वाळूजमहानगर : प्रतिनिधी
साजापूर परिसरात एकाने प्रेयसीचा खून करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी समोर आला. केवळ तीन दिवसांपूर्वी दुसरे लग्न झालेल्या प्रियकराने प्रेयसीसोबत झालेल्या वादातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैष्णवी खराडे ही साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे झरीना मुसा शेख यांच्या घरात राहत असून ती वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत होती. दरम्यान, चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तिच्या सोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने घरमालकाची मुलगी ही त्यांना सांगण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला दरवाजा ठोठावला, पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर घरमालकानेही आवाज देण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार पाहून शेजारचे नागरिकही तेथे जमा झाले.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा एक तरुण साडीच्या साहायाने गळफास घेतलेला दिसला, तर एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली दिसली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले.

तीन दिवसांपूर्वी प्रियकराने केले दुसरे लग्न
वैष्णवी व शिवानंद या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने दोघांनी लग्न केले. त्यानंतर चार-पाच महिन्यांपूर्वी शिवानंद हा तिच्या सोबत राहण्यासाठी आल्याने तिने वरील रूम बदलून खाली दोन रूम घेतल्या व ते दोघे राहत होते. मात्र, शिवानंद याने तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न केले. यातून दोघांमध्ये वाद झाल्याने तिचा खून करून त्याने स्वत: गळफास घेतल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR