नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रात यापूर्वी अनेक पक्षांचे अनेक लोक राजकारण करून गेले. पण, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी जितकी संपवली, खराब केली आणि नासवली. फडणवीसांनी जे सूडाचे राजकारण केले, तसे राजकारण यापूर्वी कोणीही कधीही केलेले नव्हते, त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची की टिकवायची नाही, याचा विचार महाराष्ट्राने करायचा आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
भास्कर जाधव आज (ता. २ ऑगस्ट) शिर्डीच्या दौ-यावर आले होते. साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. मी राहीन किंवा फडणवीस राहतील, या उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर महाराष्ट्राने विचार करायचा आहे की, राजकारणात आता कोणाला ठेवायचे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे राज्याला विचार करायला लावणारे आहे. त्यांची यापूर्वीची भाषणे पाहिली तर इतके रागावून, चिडून, निर्वाणीचे आणि आर या पारचे भाषण कधीही त्यांनी केलेले नाही. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यांनी ललकारले आहे.
देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्राने पाच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले. त्या मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवून आपले राजकारण स्थिर करायला पाहिजे होते. राजकारण आणखी मजबूत करायले पाहिजे होते. पण त्याऐवजी फडणवीसांनी आपल्या मित्रांना, विरोधकांना आणि स्वपक्षीयांना संपविण्याचा सपाटा लावला होता. त्यातीलच एक भाग देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबाबत केला होता. त्याच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी अत्यंत निकराचा लढा पुकारला आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.