गंगाखेड : अट्टल घरफोडी करणारा व ५ वर्षांपासून फरार असलेल्या बबड्या बापुराव भोसले या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसानी दि.९ जून रोजी जेरबंद केले. भोसलेची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली असून जिल्ह्यातील ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी जवळून चोरी केलेला अडीच तोळे सोने, चांदीचे दागिने व नगदी ४ लाख २२ हजार ५५८ रूपयांचा नगदी मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वे व स्थागुशा पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पीएसआय चंदनसिंग परिहार, पोलिस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, गजानन शिरसागर, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार, महिला अंमलदार जयश्री आव्हाड, चालक उत्तम हनवते यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना मौजे उक्कडगाव शिवारात आले.
या ठिकाणी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, दैठणा व पुणे पोलिसांना पाहिजे असलेला अट्टल गुन्हेगार सचिन उर्फ बबड्या बापूराव उर्फ बाळू भोसले हा लिंबा गावाकडे मोटरसायकलवर जात आहे. माहितीवरून सापळा रचून पकडण्यात आले. पोलिसांनी प्रथमोपचार करून त्यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता आरोपी भोसलेने गंगाखेड सोनपेठ, पालम, पूर्णा व परळी तालुक्यात त्याचे साथीदार जायक्या तुकाराम शिंदे (राहणार बार्शी), सुर्या उर्फ श्रीकांत चव्हाण, छोटा मोहन भोसले यांचेसोबत घरफोड्या केल्याचे सांगितले. सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्यास पुढील कार्यवाहीस्तव वैद्यकीय उपचार करून पोलीस स्टेशन गंगाखेड येथे ताब्यात देण्यात आले.
















