रायपूर : वृत्तसंस्था
संगीत विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लोकगायकाचे निधन झाले आहे.पद्मविभूषण विजेत्या तीजन बाई यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायिकेच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, कलाक्षेत्र, संगीतविश्व, मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
पांडवाणी या लोककलेच्या दिग्गज कलाकार असलेल्या तीजन बाई यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. रायपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या तिथे गेल्या काही आठवड्यांपासून उपचार घेत होत्या. आज पहाटे ३:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात १९५६ मध्ये जन्मलेल्या तीजन बाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘पांडवाणी’ या महाभारतावर आधारित पारंपरिक कथा-सादरीकरण आणि कलेच्या जतनासाठी समर्पित केले. भारत सरकारने तीजन बाई यांना १९८८ मध्ये ‘पद्मश्री’ आणि त्यानंतर १९९५ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ देऊन गौरव केला.त्यांना २००३ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच वर्षी त्यांना बिलासपूर विद्यापीठाकडून मानद ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डी. लिट.) ही पदवीही प्रदान करण्यात आली.
















