मानवत : फायनान्स कर्मचा-यांना त्यांचे जवळ कायदेशीर कागदपत्रे आहेत का अशी विचारपूस करणा-या मानवत पोलीस स्टेशन कर्मचा-यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना काल बुधवारी दुपारी घडली. यावेळी फायनान्स कर्मचारी असे सांगणा-या एकाने पोलिस कर्मचा-याचा हाताचा चावा घेवून जखमी केले. तसेच पळून जात असताना पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, मानवत येथील पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख गाझीयोददीन शेख हबीब हे मानवत शहर बीट क्रमांक २ बीट अंमलदार म्हणुन कामकाज करतात. ते दि.२ एप्रिल रोजी सहकारी नारायण सोळंके यांच्यासह पेठमोहल्ला येथे फीक्स पाइंटवर हजर होते. यावेळी त्यांना मानवत ते पाथरी रोडवर मानवत ते रत्नापुर दरम्यान इंडेन गॅस गोडावुन समोर तीन इसम मोटारसायकलस्वारास अडवुन धमकावत आहेत अशी माहीती मिळाली. दोघे पोलिस कर्मचारी मानवत ते रत्नापुर रोडवर गॅस गोडावुन समोर पोहचले असता तीन इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी पवनसींग गब्बुसींग बावरी, भिमसींग जिपुसींग बावरी व दिपसींग रुबाबसींग बावरी सर्व रा. एकता कॉलनी मानवत असे सांगीतले. या वेळी संबंधित युवकांनी मोटारसायकल एमएच २० एफएल ९६८२ अडवल्याचे मोटरसायकल चालक व त्यांचे सोबतच्या महीलेने सांगितले. तुम्ही गाडीचे हप्ते भरलेले नाहीत. आम्ही तुमची गाडी उचलुन नेतोत असे म्हणत असल्याचे पोलिस कर्मचा-यांना सांगीतले.
यावेळी पोलिसांनी विचारणा केली असता युवकांनी आम्ही फायनान्सच्या गाडया उचलुन जप्त करण्याचे काम करतो असे सांगीतले. यावेळी पोलिसांनी ओळखपत्र किंवा ही गाडी उचलणे बाबत काही कागदपत्रे आहेत काय, तुम्ही पोलिस स्टेशनला इंटेमेशन दिले आहे काय असे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत आम्ही गाडी उलचुन नेणार असे सांगून पोलिस कर्मचा-यांसोबत हुज्जत घातली. यावेळी पवनसींग बावरी याने पोलिस कर्मचारी शेख गाझियोद्दीन यांचे डावे हाताच्या मनगटाजवळ चावा घेवुन जखम केले. अन्य दोघे तेथुन पळुन जाताना पवनसींग बावरी हा खाली पडला व पुन्हा उठुन त्याने दोन्ही पोलिस कर्मचा-यांच्या दिशेने दगडे फेकुन मारले. या वेळी पवनसींग बावरी व भिमसींग जुन्नी हे दोघेही मोटारसायकलवर बसुन तुम्हाला बघुन घेतो अशी धमकी देवुन निघुन गेले.
या घटनेत पोलिस कर्मचा-यांस जखमी केल्या प्रकरणी तसेच पोलिसांच्या दिशेने दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शेख गाझियोद्दीन यांचे फिर्यादीवरून पवनसींग बावरी, भिमसींग बावरी व दिपसींग बावरी यांचे विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि. दिगंबर पाटील हे करीत आहेत.