व्हँकुव्हर : वृत्तसंस्था
फुटबॉलचा महाकुंभ म्हटल्या जाणा-या फिफा वर्ल्ड कपमध्ये जोरदार सामने पहायला मिळत आहेत. अशातच गुरुवारी रात्री उशिरा कॅनडाने जबरदस्त खेळ करत कतारच्या टीमचा ६-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला.व्हँकुव्हरच्या बीसी प्लेस स्टेडियमवर कॅनडाने एकतर्फी विजय मिळवला असला, तरी मॅच संपल्यानंतर मैदानावर दोन्ही देशांच्या खेळाडूंमध्ये जोरदार राडा आणि धक्काबुक्की पाहायला मिळाली.
इस्माईलच्या दुखापतीवरून जोरदार वाद
मॅच संपल्याची शिट्टी वाजताच कॅनडाचे मुख्य कोच जेसी मार्श हे कतारचे मॅनेजर जूलन लोपेटेगुई यांच्याशी हॅडशेक करण्यासाठी गेले. परंतु, त्याच वेळी दोन्ही कोचमध्ये इस्माईलच्या दुखापतीवरून जोरदार वाद सुरू झाला. कॅनडाच्या कोचचे हे वर्तन कतारच्या खेळाडूंना आवडले नाही आणि पाहता पाहता दोन्ही बाजूचे खेळाडू आणि स्टाफ एकमेकांना भिडले, ज्यामुळे सिक्युरिटी गार्डला मैदानात धाव घ्यावी लागली. त्यावेळी मैदानात मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले.
मैदानात तुंबळ हाणामारी
मोठ्या वादाची ठिणगी मॅच दरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे पडली होती. कतारचा खेळाडू असिम मदीबो याने कॅनडाचा मिडफिल्डर इस्माईल कोन याला धोकादायक पद्धतीने टॅकल केले होते, ज्यामुळे इस्माईल गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे कॅनडाचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफ आधीच प्रचंड संतापले होते, ज्याचा स्फोट मॅच संपल्यानंतर मैदानावर झाला अन् मैदानात तुंबळ हाणामारी झाली.
इस्माईलची जर्सी हवेत फडकवली
दरम्यान, पहिला हाफ झाल्यानंतर दुस-या हाफच्या सुरुवातीला झालेल्या या गंभीर दुखापतीनंतर इस्माईल कोन याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. रेफरीने या फाऊलसाठी असिम मदीबोला थेट रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढलं पण कॅनडाचे खेळाडू प्रचंड संतापले होते. स्माईलच्या जागी मैदानात आलेल्या जेकब शॅफेलबर्गने गोल केल्यानंतर इस्माईलची जर्सी हवेत फडकवून त्याला हा गोल समर्पित केला. त्यावेळी देखील कतारचे खेळाडू भडकल्याचे पहायला मिळाले होते.
















