25.2 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसोलापूरफिल्ड टेस्ट किटद्वारे तपासली जाणार पाण्याची गुणवत्ता

फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासली जाणार पाण्याची गुणवत्ता

सोलापूर : आरोग्य सेवक व जलसुरक्षा रक्षक यांच्यामार्फत नियमित पाणी गुणवत्ता तपासणी होणार आहे. त्याशिवाय आता गावातील पाच महिलांमार्फत फिल्ड टेस्ट किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासली जाणार आहे. त्याद्वारे पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतानाच त्याबाबत नागरिकांत जनजागृती निर्माण करणे, पाणी व स्वच्छतेबाबत त्यांना सजग करण्याचा प्रयत्न आहे.असे जलजीवन मिशन प्रकल्प संचालक
अमोल जाधव यांनी सांगीतले.

ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत आता गावस्तरावर कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी त्यांची निवड केली असून, तालुकास्तरावर प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे.पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासणीसाठी पाच महिलांची निवड केली आहे.

त्यात आशा सेविका व अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यामार्फत आता गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे फिल्ड टेस्ट किटद्वारे (एफटीके) पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे. त्यातील दोन सक्रिय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. त्यांना तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे. ११ फेब्रुवारीपासून या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. ते १० मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ते गावातील उर्वरित तीन महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यांच्यामार्फत फिल्ड टेस्ट किटद्वारे गावातील पिण्याच्या नळपाणी पुरवठा जलस्त्रोतांसह शाळा, अंगणवाडीत पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.

पाणी गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्यातील १ हजार १२३ गावातील प्रत्येकी ५ अशा एकूण ५ हजार ६१५ सक्रिय महिलांची निवड केली आहे. त्यापैकी प्रत्येक गावातील २ महिलांना फिल्ड टेस्ट किटचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांच्या प्रशिक्षणानंतर उर्वरित तीन महिलांनी प्रशिक्षण देऊन पाणी तपासणीला सुरवात होणार आहे. पाणी तपासणीची माहिती केंद्र सरकारच्या ‘ई-जलशक्ती’ संकेतस्थळावर भरली जाणार आहे.

ग्रामीण भागात गावस्तरावर आरोग्य सेवक व जल सुरक्षकांमार्फत पाण्याचे नमुने घेतले जायचे. त्यांच्याकडून ते जिल्हास्तरीय ७ व उपविभागीय स्तरावरील ७ प्रयोगशाळांमध्ये पाठवले जायचे. त्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि व्यापक प्रमाणात नियमित पाणी तपासणीसाठी आता कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत आता गावातील पिण्याच्या जलस्रोतांचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR