जिंतूर : तालुक्यातील फुलवाडी गावाजवळील पुलाचे काम न झाल्यामुळे वर्षानुवर्ष या गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून नदी पात्र ओलांडत शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. परंतू या याबद्दल ना प्रशासनाला देने घेणे ना राजकीय मंडळीना. त्यामुळे गावक-यातून प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
आडगाव- इटोली रस्त्यावर फुलवाडी हे ५०० लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे. या गावांमध्ये बहुतांश बंजारा आणि आदिवासी समाज आहे. मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ ५०० ते ७०० फुटाचे अंतर असून तत्कालीन खा. गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून ७ लाख रुपये खर्चून हा रस्ता झाला. मात्र गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा प्रश्न अधांतरीच राहिला.
पुलासाठी मोठा खर्च येत असल्याने व मतदार संख्या कमी असल्याने राजकीय नेतृत्वानेही याकडे लक्ष दिले नाही. या गावातून १ली ते १२वी पर्यंतचे १०० ते १२५ विद्यार्थी गडदगव्हाण, आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज जात असतात. पावसाळ्यात ज्यावेळेस ओढ्याला पाणी येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना कधी गडदगव्हाण तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो. शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकही पाण्यामुळे गावात येत नाहीत. पाणी कमी झाल्यानंतर पालकांच्या मदतीने ओढा ओलांडून शाळेत जावे लागते. ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी व नागरिक करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पुल मंजूर करावा अशी मागणी होत आहे.
बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
आडगाव इटोली मार्गावर नेहमी धावणा-या व शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या मानव विकासच्या बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. आडगाव -इटोली रस्त्यावर काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गिट्टी अंथरूण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील बस बंद असल्याचे दिसत आहे. यामुळे शाळकरी मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
हे चित्र केव्हा बदलणार
जिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. या रस्त्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद विभागाचे कोणतेही लक्ष नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकडे प्रशासकीय व राजकीय पातळीवर लक्ष देणे गरजेचे आहे.
पूलासाठी प्रतिसाद नाही
फुलवाडी येथील पुलाच्या कामाच्या संदर्भात अनेक वेळा आपण प्रशासकीय व राजकीय पातळीवर पुल करावा यासाठी प्रयत्न केला. परंतु दोन्ही विभागाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी हा जीवघेणा प्रवास करीत आहेत असे गडद गव्हाण ग्रामस्थ श्रीरंग राठोड यांनी सांगितले.