21.5 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांनी सोडले दिव्यांग कल्याण अभियानचे अध्यक्षपद

बच्चू कडू यांनी सोडले दिव्यांग कल्याण अभियानचे अध्यक्षपद

सुरक्षाही मागे घ्या, दिव्यांगांसोबत बेईमानी अशक्य
अमरावती : प्रतिनिधी
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाठी मंत्रालयाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. पदावर राहून हे काम होणार, ही शक्यता मला मावळताना दिसत आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी करणे मला शक्य होणार नाही, असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठविताना भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. परंतु अद्याप दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही. या विभागाच्या अध्यक्षपदावर राहून हे काम होणार, अशी शक्यता मला दिसत नाही. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही. त्यामुळे माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करुन सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षाही काढून टाकावी, असेही पत्रात म्हटले आहे.

राज्यात दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारे मानधन सर्वात कमी आहे. हे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावे लागणार आहे. या पदावर राहून दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही, म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

५ टक्के निधीही खर्च होत नाही
स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांसाठी तरतूद असलेला ५ टक्के निधी खर्च करीत नाहीत. अजूनही या विभागासाठी स्वतंत्र मंत्री नाही, सचिव नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही, पदभरती नाही. इतर अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही, असेही प्रहारचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR