परभणी : बदलत्या काळाबरोबर भाषा बदलते तत्वज्ञान नाही. काळानुसार लोकांना समजेल अशा भाषेत ते तत्वज्ञान मांडल्यास लोकांना ते पटते. माणसाने फक्त स्वत:ला त्याच्याशी जोडून घेणे आवश्यक आहे. कलावंताच्या तुलनेत लिहीणारे कायम अजरामर असतात. डॉ. जगदीश नाईक यांनी लिहीलेल्या तुकायन या पुस्तकाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज आजही जिवंत आहेत असे प्रतिपादन जेष्ठ सिने कलावंत पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, दि.९ मार्च रोजी लेखक डॉ. जगदीश नाईक यांनी लिहीलेल्या तुकायन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते थाटात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी डॉ. इंद्रजीत भालेराव होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गाथा अभ्यासक तथा नेत्र रोग तज्ञ डॉ. विकास बाहेकर, डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. जगदीश नाईक यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पद्मश्री डॉ. आगाशे म्हणाले, आधुनिक शास्त्र शिकणा-यांनी आपल्या संस्कृतीचा देखील अभ्यास करावा. मानसोपचारातील आरईबीटी शास्त्र डॉ. जगदीश नाईक यांनी लहान पणापासून आपल्या आईच्या ओव्यांच्या माध्यमातून ऐकले. तुकायन हा ग्रंथ लिहून त्यांचा मानशास्त्राचा विद्यार्थी असल्याचा हेतू ख-या अर्थाने सफल झाला आहे. मला लिहीणा-यांचा नेहमी हेवा वाटतो. त्यामुळे लिहीण्याची कला अवगत असणा-यांनी लिहावे. दिठी चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा परभणीकरांच्या भेटीने येईल असे आश्वासन पद्मश्री डॉ. आगाशे यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. बाहेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतिक संत तुकाराम महाराज आहेत. दुष्काळामध्ये शेतक-यांना पहली कर्जमाफी देणारे संत तुकाराम महाराज होते. स्वत:ला शोधल्याशिवाय काहीही सापडत नाही असे डॉ. बाहेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी प्रा. भालेराव म्हणाले, जेष्ठ अभिनेते डॉ. आगाशे आपल्या वैविध्यपूर्ण भुमिकांमुळे अजरामर आहेत. युग प्रवर्तक चित्रपटांची प्रथा निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तुकोबांची गाथा प्रत्येकाला तृप्त करते. गाथेने परीसराचे स्वरूप धारण केले आहे. गाथेने प्रत्येकाच्या विचाराला बळ पुरवण्याचे कार्य केले आहे, असे मत प्रा. भालेराव यांनी व्यक्त केले.
यावेळी लेखक डॉ. जगदीश नाईक यांनी तुकायन पुस्तक लिहीण्याचे श्रेय आई, मित्र व रूग्णांना असल्याचे आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भगवान काळे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. दिलीप श्रृंगारपुतळे यांनी तर पाहुण्याचा परीचय कवी अरविंद सगर यांनी करून दिला. आभार बाळू बुधवंत यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.