लातूर : प्रतिनिधी
एक तरुण उत्तम दिग्दर्शक, अभिनेता, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, नेपथ्यकार, अशा विविध रुपात नटराजाची सेवा करणारा रंग्कर्मी कल्याण वाघमारे दोन्ही किडनी निकामी झाल्याने घायाळ झाला आहे. सततच्या डायलिसिसमुळे उदरनिर्वाह कठीण होत चालले आहे. मदतीची याचना करण्यासाठी तो कुणापुढे आला नाही. पण, मित्रांनी एकत्र येऊन व्यावसायिक नाटकाचा प्रयोग सादर करुन ‘कल्याण’ निधी उभा करण्याचा संकल्प केला आहे. त्यातून किडनी प्रत्यारोपण केले जाणार आहे.
नाट्यकर्मी मित्रांनी एकत्र येऊन कल्याणच्या उपचाराचा खर्च करण्याचा मानस बोलून दाखवला. पण, कल्याणने नम्रपणे हा प्रस्ताव नाकारला. पुढे युक्ती सूचली. तुम्ही दिग्दर्शित केलेल्या नाटकाचा व्यावसायिक प्रयोग करायचा. त्याच्या तिकीट विक्रीतून येणारा पैसा कल्याण निधी म्हणून संकलीत करुन उपचारासाठी वैद्यकीय खर्च उभा करायचा, असा प्रस्ताव कल्याणसमोर ठेवण्यात आला. तो प्रस्ताव कल्याणने मान्य केला. लातुरातील नाट्यकर्मी मित्रांनी व तंत्रज्ञांनी याकामी पुढाकार घेतलेला आहे.
कल्याणची मोठी बहिण एक किडनी दान देण्यास तयार आहे. सुदैवाने त्याबाबतच्या चाचण्या केल्या असून कल्याणच्या शरीराला ही किडनी अनुरुप होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता नाट्यप्रयोग करणे आणि त्यातून पैसा उभा करणे, असा संकल्प नाट्यकर्मी मित्रांनी केला आहे. ‘सभ्य गृहस्त्थ हो…’ या नाटकाचा प्रयोग २२ फेबु्रवारीला तर १ मार्च रोजी ‘नटसम्राट’ या नाटकाचा प्रयोग शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती भवनात ‘कल्याण’ निधीसाठी होणार आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी १२ लाख रुपये खर्च येणार आहे. तो खर्च यातून उभा केला जाणार आहे.
कल्याण वाघमारे यांची लहानपणापासूनच बाल कलाकार म्हणून रंगभूमीशी नाळ आहे. आजही तब्येत बरी नसतानाही त्यांचा नाट्यप्रवास निरंतर सूरुच आहे. ‘कल्याण’ निधीसाठी आयोजित दोन्ही नाट्यप्रयोगाला प्रेक्षकरुपी दात्यांनी नाटकाला यावे. असे आवाहन नाट्यकर्मीं मंडळींनी केले आहे.