ढाका : बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर ९ दिवसांच्या आत गृहमंत्री सखावत हुसैन यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेथील विद्यार्थी नेते निवृत्त ब्रिगेडियर जनरल एम. सखावत हुसेन यांच्यावर प्रचंड नाराज होते. त्यामुळे त्यांच्या विरोधानंतर एम. सखावत यांना गृहमंत्रिपदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी निवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी गृहमंत्रालयाच्या सल्लागारालाही विद्यार्थी नेत्यांच्या विरोधानंतर हटवण्यात आले होते. अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर ९ दिवसांत उचललेले हे दुसरे मोठे पाऊल आहे. बांगलादेशची सरकारी वृत्तसंस्था बांगलादेश संवाद संस्था (बीएसएस) ने वृत्त दिले आहे की मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने चार मंत्रालय आणि राष्ट्रपती कार्यालयात पाच सचिवांची नियुक्ती केली आहे.
शुक्रवारी निवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांच्यासह चार नवीन सल्लागारांनी पदाची शपथ घेतली. मुख्य सल्लागार युनूस यांच्या निवेदनानुसार, अंतरिम सरकारने आठ सल्लागारांच्या खात्यांचे पुनर्वितरण केले असून सखावत यांच्याकडे वस्त्रोद्योग आणि ज्यूट मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर जहांगीर आलम यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.