सांगली : प्रतिनिधी
भाजप आमदार नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. सांगलीतील पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चावेळी बोलताना नितेश राणे यांनी भरसभेत थेट पोलिसांना दम भरला आहे. मस्ती कराल तर बायकोला फोनही लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू,’ असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पलूस शहरामध्ये लव्ह जिहादविरोधात शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधला. ‘पोलिस ठाण्यात लव्ह जिहादबाबत तक्रार देण्यात येणा-या मुलीची तक्रार अर्धा तासांत घेतली पाहिजे. अन्यथा पुढच्या तीन तासांत पोलिस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू,’ असा इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला आहे.
सरकार हिंदूचे आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही. लव्ह जिहादमध्ये मुलगी गेलेल्या बापाची भावना समजून घ्या. अशापद्धतीचे अश्रू परत माझ्या इथल्या हिंदू मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा दुप्पट अश्रू मी तुमच्या डोळ्यातून काढण्याची गॅरंटी देतो’, अशा शब्दात नितेश राणे यांनी पोलिसांना खडसावून सांगितले.