बारामती : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाकडून अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे तांदुळवाडीसह संपूर्ण बारामतीत या बॅनरची चर्चा होऊ लागली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या काळातही बारामती मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली आहे. बारामतीत दिवसेंदिवस राजकारण तापत चालले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही बारामतीतील लढत रंगणार असल्याचे दिसत आहे. बारामतीतून कोण निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरू असताना अजित पवार हेच स्वत: बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात महायुतीच्या जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. तर ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणी त्याच पक्षाच्या उमेदवाराला तिकिट मिळणार, असा महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे अनेक जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत तर काही ठिकाणी अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाहीत. पण अजित पवार हे बारामतीतूनच लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौ-यावर आले होते. त्यावेळीही अजित पवार यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती समोर आली होती. विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, राज्यात बिहार पॅटर्न राबवा, अशी मागणी अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहांकडे केल्याचे सांगितले जात होते. पण त्यांनी मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळून लावले आहे. दाखल करण्यात आला आहे.