19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत नातवाच्या अर्जासाठी आजोबा तहसील कार्यालयात

बारामतीत नातवाच्या अर्जासाठी आजोबा तहसील कार्यालयात

युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल

बारामती : प्रतिनिधी
बारामती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

तत्पूर्वी युगेंद्र यांचे कन्हेरी येथील निवासस्थानी मातोश्री शर्मिला यांच्याकडून औक्षण करण्यात आले. ग्रामदैवत कन्हेरीच्या मारुतीचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर आत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत त्यांनी शहरातील कसबा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

तद्नंतर इंदापूर रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते प्रशासकीय भवनात दाखल झाले. तेथे शरद पवार यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. जगताप, सदाशिव सातव, सतीश खोमणे यांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज दाखल केला.

पास होण्यासाठीच परीक्षेला बसलोय :
खा. सुप्रिया सुळे
बारामतीमध्ये एक समांतर यंत्रणा, अदृश्य शक्ती बारामती चालवत आहे. हे अजिबात चालणार नाही. आगामी काळात ही समांतर यंत्रणा मोडून टाकण्यात येईल. सर्वसामान्य बारामतीकर बारामती चालवतील. केवळ बिल्डिंग्ज उभ्या करून प्रश्न सुटत नाहीत तर त्याचा सोशल इम्पॅक्टमध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परीक्षेला पास होण्यासाठीच बसलोय, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. युगेंद्र यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हेरी येथे मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. गेली सहा दशके शरद पवार यांना बारामतीकरांनी प्रेम दिले आहे. या निवडणुकीतही ते दिसून येईल असे त्या म्हणाल्या.

आजोबा पाठीशी
मी गेली काही वर्षे समाजकारणात सक्रिय होतो. पक्षाने उमेदवार देत मोठी जबाबदारी दिली, त्याचा आनंद आहे. मी राजकारणात नवखा असलो तरी ५० वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द असणारे आजोबा शरद पवार माझ्यासोबत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. बारामतीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भ्रष्टाचार बोकाळला आहे, गुन्हेगारी वाढली आहे. अशा अनेक प्रश्नांसाठी आपला लढा असेल. तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाईल असे युगेंद्र पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR