अजितदादांना अखेरचा निरोप, विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बारामती : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या, आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या, कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत लोकांमध्ये राहिलेल्या लोकनेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजितदादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी बारामतीत मोठा जनसागर लोटला होता.
अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. तेथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणारे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत, हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ््याच्या कडा पाणावल्या.
येथे जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायाने अजितदादा अमर रहेचा जयघोष केला. या घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. अश्रूचा बांध फुटलेला असतानाच दादा परत या…परत या… अशा घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातील चौथ-यावर ठेवण्यात आले. त्यानंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार करण्यात आले. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी शासकीय इतमामात बंदुकीच्या फैरी झाडून अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय मंत्र्यांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या अनपेक्षित निधनाने बारामतीकर पोरके झाले आहेत.
अखेरचा निरोप देण्यासाठी
देशभरातून बारामतीत रिघ
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीत दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गो-हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, माजी मंत्री अमित देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल्ल पटेल, राज ठाकरे, रितेश देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
अख्खे मंत्रालय गहिवरले
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी कर्मचा-यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना गहिवरल्या भावनेने श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केली.

