22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeधाराशिवबारामतीने स्वीकारले पण बीडने मात्र नाकारले.... 

बारामतीने स्वीकारले पण बीडने मात्र नाकारले…. 

कळंब : सतीश टोणगे
सर्वसामान्य मतदारांना जसा पाहिजे तसा निकाल लागल्याने, नेत्यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका सत्ताधारी मंडळींना बसला, त्यामुळे आता येणा-या विधानसभेसाठी सावध भूमिका घेतली जाईल. सर्वांत शेवटी बीडचा धक्कादायक निकाल लागला. प्रत्येक निवडणुकीत चालणारी ‘भाऊ’ची ‘दादागिरी’ यावेळी मोडीत निघाली. तर बारामतीमध्येही ‘दादा’ची ‘दादागिरी’ चालली नाही.

बारामतीच्या कन्या सुप्रियाताईंना बारामतीकरांनी स्वीकारले, पण बीडच्या माहेरवाशीण पंकजाताईंना मात्र बीडकरांनी नाकारल्याने राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. बीडमधील निकालाच्या शेवटपर्यंत शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी निकराची झुंज देऊन ‘बिहार’ होत असलेल्या बीडमध्ये सर्वसामान्यांचा शिरकाव केला. बजरंग सोनवणे हे कळंबचे जावई असल्याने सासरवाडीत दिवाळी साजरी झाली.

तर धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी राज्यात प्रथम क्रमांकाची विक्रमी मते घेऊन धाराशिवच्या सूनबाई सौ. अर्चनाताई पाटील यांचा चार लाख मतांनी पराभव केला. राज्यात यवतमाळच्या माहेरवाशीण सौ. राजश्री हेमंत पाटील यांनाही माहेरच्या मंडळींनी सासरचा रस्ता दाखवला. तर हनुमान चालीसामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री नवनीत राणावरही घरी बसण्याची वेळ आली. एकंदर बलाढ्य उमेदवारांवर मतदारांनी घरी बसण्याची वेळ आणल्याने आता रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मतदार देऊ लागले आहेत.

राज्यात बीड आणि बारामतीच्या लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष होते. राज्यात जरांगे फॅक्टरमुळे भाजपाच्या बड्या नेत्याला पराभव चाखावा लागला. बारामतीने सुप्रियाताई सुळे यांना स्वीकारले पण बीडने मात्र पंकजाताईला नाकारल्याची चर्चा होऊ लागली आहे. सोशल मीडियावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जात असून अधिकचा आत्मविश्वास नडल्याची चर्चा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR