30.4 C
Latur
Sunday, March 15, 2026
Homeमहाराष्ट्रबारामती, राहुरीमध्ये होणार पोटनिवडणूक

बारामती, राहुरीमध्ये होणार पोटनिवडणूक

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?
मुंबई : प्रतिनिधी
देशातील ५ राज्य विधानसभांसोबत ८ रिक्त जागांसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. राहुरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात निधन झाले. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या दोन्ही जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे. परंतु अन्य कोणी उमेदवारी अर्ज भरणार का, याकडे लक्ष असेल. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे १७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडी निवडणूक लढू शकते. माजी आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे तर भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंच्या नावाची चर्चा आहे.

पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी : ३० मार्च २०२६
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : ६ एप्रिल २०२६
अर्जांची छाननी : ७ एप्रिल २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ एप्रिल २०२६
मतदानाची तारीख : २३ एप्रिल २०२६
मतमोजणी : ४ मे २०२६
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : ६ मे २०२६