37.7 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्रबारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

बारावीच्या परीक्षेत यंदाही मुलींचीच बाजी, राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

पुणे : प्रतिनिधी
आज दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. पण निकालाच्या दोन तास आधी शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या नंतर आज सोमवारी (ता. ५ मे) दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. पण नेहमीप्रमाणेच, निकालाच्या दोन तास आधी म्हणजेच सकाळी ११वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचे शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, कोकण या नऊ विभागांमधून १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांची टक्केवारी ९१.८८ टक्के इतकी आहे. खासगी विद्यार्थ्यांची संख्या एकूण ३६ हजार १३३ इतकी होती, त्यापैकी ३५ हजार ६९७ जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यामुळे १७ नंबर फॉर्म भरून परीक्षा दिलेल्या आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७३.७३ टक्के इतकी आहे. तर पुर्नपरीक्षा अर्थात ४२ हजार २४ रिपीटर्स विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ हजार ८२३ रिपीटर्स विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रिपीटर्स विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे.

तसेच, यंदा बारावीच्या परीक्षेला ७ हजार २५८दिव्यांग विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विभागीय निकालाची माहिती देताना शिक्षण अधिका-यांनी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के इतका लागल्याचे जाहीर केले. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. लातूरमधून फक्त ८९.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याशिवाय, विज्ञान शाखा – ९७.३५ टक्के, कला शाखा – ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखा – ९२.६८ टक्के असा निकाल लागला आहे. तर, व्यवसाय अभ्यासक्रमात ८३.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आयटीआयचे ८२.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय निकाल

पुणे – ९१.३२
नागपूर – ९०.५२
छत्रपती संभाजीनगर – ९२.२४
मुंबई – ९२.९३
कोल्हापूर – ९३.६४
अमरावती – ९१.४३
नाशिक – ९१.३१
लातूर – ८९.४६
कोकण – ९६.७४

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR