कोची : वृत्तसंस्था
देशभरात अमली पदार्थाचे रॅकेट कार्यरत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींसह युवा वर्गही अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे भीषण वास्तव आहे. केरळमध्ये तर किंडरगार्डन अर्थात बालवाडीतील मुलांपर्यंत ड्रग्जचा पुरवठा केला जात असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
महाविद्यालयीन युवा वर्गासह किशोरवयीन मुलेही अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. ड्रग्जच्या किमती प्रतिगॅ्रम २५ हजारांवर आहेत. पहिल्या टप्प्यात नशेचे व्यसन लावले जाते. एकदा नशेचे व्यसन जडल्यानंतर अचानक पुरवठा खंडित केला जातो. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले विद्यार्थी पैशाची चणचण जाणवू लागल्यास ड्रग्जच्या रॅकेटमध्ये सामील होतात. आलिशान हॉटेल्स आणि पबमधून दलालांना ड्रग्जचा पुरवठा केला जातो.
उत्तर, पूर्व भारतात रॅकेट : लहान बालकांनाही कॅम्पसमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आमिष दाखविले जाते. उत्तर आणि पूर्व भारतातून बहुतांश अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो. यातील काही मुलांनी अजाणतेपोटी अमली पदार्थाचे सेवन केले. २०० विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासूनच अमली पदार्थांचे व्यसन लागल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. लहान मुलांच्या लघवीच्या नमुन्यातून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. केरळमधील कोचीमध्ये एका शाळेत किशोरवयीन मुले अमली पदार्थांची नशा करीत होते. बालवाडीतील मुलांसमोरच हा प्रकार सुरू होता.
कोणते ड्रग्ज घातक : हेरॉईन, ओपीआईडस्, कोकेन, एमडीएमए, मेथामफिटॅमाईन, मेथ, बेंझोडियाझेपाईन्स आदी अमली पदार्थांचे व्यसन लागल्यास व्यसन सोडणे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे समुपदेशन आणि योग्यवेळी वैद्यकीय उपचार हाच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा उपाय मानला जातो.
२६ बालकांसह ५३० जणांवर उपचार
केरळमध्ये ५३० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १८ ते २२ वयोगटातील मुलांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच व्यसन लागल्याचे पुढे आले आहे. यामध्ये २६ बालकांचाही समावेश होता.