बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा क्रूर मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबाजोगाई येथे एका दलित तरुणाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मारहाण करणा-या आरोपींनी त्याचे पैसे आणि मोबाईल हिसकावले असून, ‘तुला खल्लासच करतो’ असे म्हणत त्याला निर्दयपणे मारहाण केली.
बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटनांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यानंतर झालेल्या विविध मारहाणीच्या घटनांनी जिल्ह्यात तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक मारहाणीचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत. अशात आता हा नवीन व्हीडीओ समोर आला आहे.
अंबाजोगाईतील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा साळे या दलित तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून पैसे आणि मोबाईल देखील काढून घेतला गेला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला, असा आरोपही केला जात आहे.
तात्काळ कारवाई करण्याची मागणी
या व्हायरल व्हीडीओमध्ये चार आरोपी मिळून या तरुणाला निर्दयपणे मारहाण करत आहेत. कोणी डोक्यात, पाठीवर, पायावर, पोटात आणि मानेवर मारत असल्याचे स्पष्ट दिसते.