बुलडाणा : प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव या तालुक्यांत गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांना अचानक केस गळतीचा त्रास सुरू झाला होता व अनेकांना टक्कल पडले होते. त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनंतर याच रुग्णांचे नखे गळण्याचे प्रमाणही वाढले होते. आता याच रुग्णांना थकवा व चिडखोरपणा जाणवत असल्यामुळे परिसरात चिंता वाढली आहे. ज्या केस गळती व नख गळती झालेल्या रुग्णांच्या रक्तांच्या नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण वाढले होते अशाच रुग्णांना आता चिडखोरपणा व थकवा येणे अशा तक्रारी समोर आल्याने परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
केस गळतीचा प्रकार समोर आल्यानंतर देशाच्या सर्वोच्च संशोधन संस्थेच्या पथकाने अर्थात आयसीएमआरच्या पथकाने या भागाचा दौरा करून अनेक नमुनेही तपासणीसाठी घेतले होते. मात्र चार महिने उलटूनही अद्याप या पथकाने अहवाल सादर केला नाही त्यानंतर नखे गळती सुरू झाली व नखे गळतीनंतरही केंद्राच्या विशेष पथकाने या परिसराचा दौरा केला. मात्र काही दिवसांतच या नागरिकांना आता थकवा व चिडखोरपणा जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने प्रशासनाने या परिसरातील नागरिकांना वा-यावर सोडल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यांतील अनेक गावांत अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. केस गळतीनंतर रुग्णांची नखे अचानक विद्रुप होऊन कमजोर होऊ लागली होती. अनेकांची नखे गळून पडली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यानंतर आता रुग्णांना प्रचंड थकवा व चिडखोरपणा जाणवू लागल्याने बुलडाण्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. कउटफ चे पथक आले. अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतले गेले. मात्र, औषधोपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वा-यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अद्यापही कउटफ चा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमके काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांना शंका येत आहे. या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे? याबद्दल नागरिक साशंक आहेत.