40 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यात येणार केंद्रीय आरोग्य पथक

बुलडाण्यात येणार केंद्रीय आरोग्य पथक

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यात केसगळतीनंतर नखेगळतीचा आजार सुरू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या नऊ विभागांतील तज्ज्ञांचे पथक आज जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

केंद्रीय पथक बाधित गावांतील रुग्णांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करणार आहे. रक्त नमुने संकलनाच्या माध्यमातून या आजारामागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव तसेच शेगावसह नांदुरा तालुक्यातील १३ गावांमध्ये केसगळतीचे प्रकार समोर आले होते. विशेष म्हणजे केसगळतीनंतर काही रुग्णांमध्ये नखगळतीचेही प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले.

बोंडगावसह ४ गावांत तब्बल २९ जणांचे नखेगळतीचे प्रकरण समोर आले आहे. केस गळतीने बाधित शेगाव तालुक्यातील अनेक गावांतील लोकांना टक्कल पडले होते. त्यावर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आयसीएमआर आणि एम्स सारख्या संस्थांचे संशोधक या संपूर्ण प्रकरणावर संशोधन करायला आले होते. या संपूर्ण प्रकरणात लोकांचे केस, त्वचा, रक्त एवढेच नाही तर गावातील पाणी आणि धान्याचे नमुने देखील तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर या केसगळती प्रकारात रुग्णांच्या शरीरात वाढलेले सेलेनियम असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र याबाबतचे रिपोर्ट अजूनही सरकारकडून जाहीर करण्यात आले नाहीत. सेलेनियम रुग्णांच्या शरीरात आले कसे याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.

बोंड गावातील बेबाबाई इंगळे यांना गेल्या आठ दिवसांपासून नखेगळतीचा त्रास सुरू झाला आहे. गावात बहुतांश लोकांना ज्यांना केसगळती झाली होती, त्यांना या नखेगळतीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. मात्र बोंड गावातील बेबाबाई इंगळे यांना केसगळती झालेली नव्हती. तरीही त्यांना आता नखेगळतीच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे बोटांमध्ये ठणक येऊन अंगात ताप येत असल्याची माहिती बेबाबाई यांच्या कुटुंबाने दिली आहे.

बोंडगावसह परिसरातील चार गावांत आतापर्यंत नखेगळतीचे एकूण २९ रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून या रुग्णांची नोंद केली जात आहे. या नखेगळतीमागे देखील शरीरात वाढलेले सेलेनियमच असल्याची शक्यता स्थानिक डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR