मुंबई : प्रतिनिधी
सनी देओलचा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटातील बरेच सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सरप्राईजसुद्धा मिळाला आहे.
‘बॉर्डर २’च्या शेवटच्या श्रेयनामावलीत ‘धुरंधर’ फेम अक्षय खन्नाला पाहिलं गेलं. अक्षयच्या या कॅमिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. इतकंच नव्हे तर ‘धुरंधर’च्या यशाचा फायदा घेण्यासाठी ‘बॉर्डर २’मध्ये अक्षयचा सीन दाखवण्यात आल्याचा दावा काही नेटक-यांनी केला. त्यावर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ हा चित्रपट २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
‘बॉर्डर २’च्या एंड-क्रेडिट्समध्ये एक छोटासा सीक्वेन्स दाखवण्यात आला आहे. यामध्ये १९९७ च्या ‘बॉर्डर’मधील अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, पुनीत इस्सार आणि सुदेश बेरी प्रेक्षकांसमोर येतात. या सर्व कलाकारांच्या भूमिका ‘बॉर्डर’च्या पहिल्या भागात शहीद झाल्याचं दाखवलं होतं. प्रेक्षकांनी या सीनचे क्लिप्स ऑनलाईन शेअर केले आहेत. ‘धुरंधर’च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अक्षयचा कॅमिओ अशा पद्धतीने दाखवल्याची चर्चा त्यावरून होत आहे. यावर निर्माते भूषण कुमार यांनी आपली बाजू मांडली आहे.

