सोलापूर : पैशांची गरज असतानाही राजाराम ग्यानबा गाजरे (वय ५०, रा. शेळवे, ता. पंढरपूर) यांचा जमीन विकायला विरोध होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी विकणाऱ्याचा भावजी पांडुरंग नामदेव मिसाळ (वय ३०) याच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून त्याला खरेदीदस्त व हक्कसोड दस्त करताना दुय्यम निबंधकांसमोर उभे केले.
हा प्रकार पडताळणीवेळी समोर आला आणि सहायक दुय्यम निबंधक उमाकांत लिमसडे यांनी पंढरपूर शहर पोलिसांत दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे.
संशयित आरोपी सागर पांडुरंग मोकाशी- रितुंड (रा. दौलत नगर, जि. सातारा) व दिलीप महादेव रितुंड (रा. वाडीकुरोली, ता. पंढरपूर) यांना वारसा हक्काने अडीच एकर जमीन मिळणार होती. बाकीच्या वारसांना त्या दोघांनी तयार केले होते. पण राजाराम गाजरे यांचा जमीन विकायला विरोध होता. त्यामुळे त्या दोघांनी शक्कल लढवून त्यांच्या भावजीला राजाराम म्हणून उभे केले आणि बनावट व्यक्ती हाच राजाराम गाजरे असल्याचे सांगायला दोन ओळखदार घेतले. त्यात चंद्रकांत सदाशिव काळे व अशोक संजय मोकाशी हे ओळखदार होते.
समोरील व्यक्ती बनावट असतानाही त्यांनी तो राजाराम गाजरे आहेत म्हणून सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बनावट व्यक्ती उभी करून जमीन विकण्याचा डाव आखणारे दोघे, बनावट आधारकार्डवर उभारलेला तोतया व्यक्ती आणि दोन ओळखदार अशा पाच जणांविरुद्ध सहायक दुय्यम निबंधकांनी स्वत:च फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने त्या पाच संशयितांना जेरबंद करून न्यायालयात हजर केले होते. पोलिस उपनिरीक्षक महादेव पिसाळ तपास करीत आहेत.
पंढरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दीड एकराचा हक्कसोड दस्त तर एक एकराचा खरेदीदस्त करताना तेथील अधिकाऱ्यांनी ‘आय सरिता’ या नोंदणी पोर्टलवर आधारकार्डची पडताळणी केली. त्यावेळी खरेदीसाठी मान्यता देणाऱ्या पांडुरंग नामदेव मिसाळ (वय ३०) याने राजाराम गाजरे यांचे आधारकार्ड स्वत:चे म्हणून जोडल्याची बाब निदर्शनास आली. तरीदेखील, दस्तात नोंदविलेल्या दोन ओळखदारांनी देखील समोरील व्यक्ती बनावट असल्याची माहिती असतानाही तोच राजाराम गाजरे असल्याचे सांगितले होते. पण, त्यांची बनावटगिरी मुद्रांक शुल्क विभागाकडील ‘आय सरिता’ पोर्टलमुळे उघड झाली, असेही फिर्यादी नमूद आहे.