अहमदपूर : प्रतिनिधी
या तालुक्यातील ब्रम्हवाडी शिवारात कोणतीही मोठी नदी अथवा तलाव जवळपास नसतानाही एका शेतक-याच्या शेतात कालव्यात जवळपास दीडशे किलो वजनाची मगर सोयाबीनच्या रानात आढळून आली आहे. मध्यरात्री हा प्रकार शेतक-याच्या लक्षात येताच वन विभागाशी संपर्क साधुन परिसरातील शेतकरी व सर्प मित्रांच्या मदतीने ही मगर पकडून अहमदपूर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर मगरीस पुणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या तालुक्यातील ब्रम्हवाडी परिसरात शिवदास घुगे या शेतक-याच्या शेताजवळ मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कुत्री भुंकत होती कुत्री का भुंकताहेत हे पाहण्यासाठी शेतकरी या परिसरात गेले असता महाकाय मगर असल्याचे लक्षात आले. या संदर्भाची माहिती त्यांनी तातडीने अहमदपूर वन विभागाच्या अधिका-यांना देण्यात आली. अधिकारी पहाटे ५ वाजता घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी गोंिवद माळी, होनराव, राठोड, अंबुलगेकर, बोंबले मॅडम सर्पमित्र सिध्दार्थ काळे, आशिष कलुरे, उद्धव देगलुरे, योगेश तेलंगे, कान्हा पांचाळ, भानुदास ससाने , गजानन कांबळे आदींच्या पथकाने आणि दोन तासांच्या प्रयत्नाने मगर पकडण्यात यश आले.
मगर ताब्यात घेतल्यानंतर तिला वन विभागाच्या जीपमध्ये टाकून अहमदपूर येथे आणून वैद्यकीय पशुधन विकास अधिकारी डॉ.सुयोग येरोळे यांनी मगरीची वैद्यकीय तपासणी केली असता सदरील मगर नर जातीची असल्याचे निष्पन्न झाले तसेच त्यामगरीचे वय १० ते ११ वर्ष वजन १५० किलो व लांबी ९ फुट असल्याचे वैद्यकीय पशुधन विकास अधिकारी यांनी सांगीतले.