परभणी : भर दुपारी, तापलेल्या रस्त्यावर एका थकलेल्या वृद्ध आजीला पाणी पाजून, त्यांच्या चपला, काठी उचलून सावलीत नेऊन बसवणा-या पोलीस अधीक्षकांची ही गोष्ट फक्त अधिका-याची नाही, तर एका संवेदनशील माणसाची आहे.
छत्रपती संभाजीनगरहून परत परभणीला येत असताना, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची नजर अंबड जवळील घनसावंगी फाट्याजवळ एका वृद्ध महिलेवर गेली. अंदाजे ८०-९० वर्षे वयोगटातील या आजी वाहतूक रस्त्याच्या कडेला थकल्या-भागल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. त्या अवस्थेतूनही त्यांनी पायातील चपला सांभाळण्याचाही त्रास होत होता. अधिका-यांच्या गाडीचा वेग क्षणात थांबला. अधिकाराचं बडेजाव बाजूला ठेऊन परदेशी स्वत: खाली उतरले.
आजींना स्वत:जवळील पाणी दिलं. त्यांच्या अवस्थेची चौकशी करत, स्वत: हात देऊन झाडाच्या सावलीत नेऊन बसवलं. त्यांच्या पडलेल्या चपला, काठी, पिशवीही उचलून त्यांच्या जवळ आणून दिली. त्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी आयपीएस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांच्याशी संपर्क साधून तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. पोलीस हवालदार विष्णू चव्हाण आणि स्वप्नील भिसे शासकीय वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक परदेशी यांनी स्वत: त्या आजींना वाहनात बसवून दिलं आणि मगच परभणीच्या दिशेने रवाना झाले.
या आजी अंबड तालुक्यातील बेलगाव गावच्या असून त्यांच्यावर अंबड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही केवळ एक मदत नव्हती ही होती जबाबदारीची, माणुसकीची आणि संवेदनशीलतेची जाणीव. बैलगाडी चालवणं असो, शेतक-यांशी संवाद, मुनाभाईंसारख्या अपंग व्यक्तींना प्रोत्साहन देणं असो की वृद्ध तक्रारदाराला स्वत: खाली येऊन भेटणं परदेशी सरांचे प्रत्येक कृतीत अधिका-यांच्या पुढे एक माणूस सतत जाणवतो. अंबड पोलीस ठाण्याच्या टीमनेही अत्यंत तत्परतेने या मानवतेच्या कार्यात सहभागी होत प्रशासनातील समन्वयाची सुंदर मिसाल निर्माण केली आहे.