खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका
मुंबई : प्रतिनिधी
राजकारणात येण्याचा कधीही विचार नव्हता, परंतु सामाजिक क्षेत्रात काम करताना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा जाणवल्या आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, असे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. काँग्रेसची विचारसरणी, संविधान आणि लोकशाही यांच्याशी आपली बांधिलकी असल्याचे सांगतानाच भाजपमध्ये जाण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन हिरो बना, पण तत्त्वांशी तडजोड करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप, राहुल गांधी, महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतक-यांचे प्रश्न, एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि देशातील राजकीय परिस्थितीवर परखड भूमिका मांडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या म्हणून प्रणिती शिंदे यांची राजकीय कारकीर्द चर्चेत राहिली. मात्र, राजकारणात येण्यापूर्वी आपला कल सामाजिक कार्य आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटकडे होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रणिती शिंदे यांनी पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘जाईजुई’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली. महिलांना स्वावलंबी बनवणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेणे आणि त्यांच्यापर्यंत विकासाची कामे पोहोचवणे, हा आपल्या कामाचा मुख्य उद्देश होता, असेही त्या म्हणाल्या. सामाजिक कार्याच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा जाणवल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शेतक-यांची किती चेष्टा करणार?
महाराष्ट्रातील दुष्काळ आणि शेतक-यांना देण्यात येणा-या मदतीवरून प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाच्या काळात सरकारने शेतक-यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. परंतु सत्ताधा-यांकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही. शेतक-यांची किती चेष्टा करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
















