22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपाला शेतक-यांबद्दल अनास्था ; शरद पवार

भाजपाला शेतक-यांबद्दल अनास्था ; शरद पवार

यूपीए सरकारने ७० हजार कोटींची कर्जमाफी केली

नाशिक : द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतक-याला दोन पैसे मिळाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे.

यूपीएचे सरकार असताना शेतक-यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून शेतक-यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. सध्याच्या भाजपा सरकारची शेतक-यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतक-यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केला.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा : पटोले
२०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, असे आश्वासन दिले होते. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमीभाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती. पण १० वर्षांत ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतक-यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतक-यांना फसवणा-या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

कांद्याने शेतक-याला रडवले : संजय राऊत
भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतक-याची, जनतेची बात ऐकत आहेत पण काही लोक फक्त मन की बातच करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतक-याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात आमदार-खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शेतकरी संकटात : बाळासाहेब थोरात

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मणिपूरपासून राहुल गांधी हे शेतकरी, तरुण, कामगार, महिला वर्गाला गॅरंटी देत आहेत. २००४ ते २०१४ या काळात यूपीए सरकार जनतेचे, शेतकरी हिताचे निर्णय घेत होते परंतु मागील १० वर्षांत केवळ मूठभर लोकांसाठी निर्णय घेतले जात आहेत. आज शेतकरी संकटात आहे त्याला भारतीय जनता पक्षाचे सरकारच जबाबदार आहे, असेही थोरात म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR