17 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeसंपादकीयभारताचा दारुण पराभव!

भारताचा दारुण पराभव!

बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सिडनीतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करत मालिका ३-१ अशी जिंकली. कांगारूंनी कसोटीच्या तिस-याच दिवशी विजयी लक्ष्य गाठत १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर मालिका खिशात घातली. या पराभवामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतूनही बाहेर पडण्याची नामुष्की सहन करावी लागली. मालिका विजयासह ऑस्ट्रेलियाने ११ ते १५ जून दरम्यान लॉर्डस् मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणा-या डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेचे विजेतेपद दुस-यांदा जिंकण्याची संधी कांगारूंना मिळाली आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून प्रथमच भारताचा संघ अंतिम फेरीत नसेल. भारताने दोन वेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.

पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला जसप्रीत बुमरा रविवारी गोलंदाजीसाठी फिट असता तर कांगारूंना १६२ धावांचे लक्ष्य गाठणे कठीण गेले असते. अर्थात क्रिकेटमध्ये जर-तरच्या गोष्टींना महत्त्व नसते. बुमराला सामना सोडावा लागल्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी खूपच खराब चेंडू टाकले. त्यामुळे कांगारूंनी केवळ २७ षटकांत ४ फलंदाज गमावून विजयी लक्ष्य गाठले. या मालिकेत भारतीय फलंदाजांचे अपयश आणि बुमरावरचे अवलंबित्व उघड झाले. तिस-या दिवशी सकाळी बुमराने गोलंदाजीचा सराव केला पण त्याला त्रास जाणवू लागल्याने रविवारी तो मैदानात उतरला नाही. अखेरच्या कसोटीत पहिल्या डावावर भारताला नाममात्र ४ धावांची आघाडी मिळाली होती. दुस-या डावात भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते. परंतु स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सच्या मा-यासमोर भारताचा दुसरा डाव पुन्हा एकदा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. दुस-या डावात पंतने ३३ चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी केली नसती तर भारताला कधीच गाशा गुंडाळावा लागला असता.

जयस्वालच्या २२ धावा सोडल्या तर बाकीच्या आठ फलंदाजांनी केवळ ७४ धावा जोडल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहली या बुजुर्ग दिग्गज फलंदाजांनी मालिकेत निराश केले. मालिकेत भारताकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ३९१ धावा केल्या. त्यानंतर युवा फलंदाज नितीशकुमार रेड्डीने २९८ धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक फलंदाज पंतने मालिकेत २५५ धावा काढल्या. या मालिकेत जयस्वाल, कोहली आणि नितीशकुमार यांची एकूण फक्त तीन शतके झळकली आहेत. मालिकेत गोलंदाजीत बुमराशिवाय अन्य गोलंदाजांना आपला प्रभाव पाडता आला नाही. बुमराने या मालिकेत सर्वाधिक ३२ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळींचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका गमावूनही त्याला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीर बोलँड ठरला. पाठीच्या दुखापतीमुळे निर्णायक कसोटी अर्धवट सोडावी लागलेला गोलंदाज बुमरा म्हणाला, काही वेळा खेळाडूला आपल्या शरीराचा आदर करावा लागतो.

खेळात जास्त काळ राहणे, दबाव निर्माण करणे, दबाव झेलणे या सा-या महत्त्वाच्या गोष्टी असतात. ऑस्ट्रेलियन दौ-यात भारताने ब-याच गोष्टी शिकल्या असतील. त्याचा फायदा भारतीय संघाला भविष्यात होऊ शकेल. या दौ-यातील अनुभव नितीशकुमार, हर्षित राणा या युवा खेळाडूंना भविष्यात फायदेशीर ठरेल. या मालिकेत विराट कोहलीचे अपयश खलणारे आहे. तो वारंवार ऑफ स्टम्पबाहेर चेंडूला छेडण्याची चूक करतो. अगाध अनुभव पाठीशी असलेल्या कोहलीला फलंदाजीतील हा दोष लक्षात कसा येत नसेल? निश्चयाचा अभाव हे त्याच्या अपयशाचे प्रमुख कारण आहे. मागे ऑस्ट्रेलियात सचिन तेंडुलकर ऑफ स्टम्पबाहेर वारंवार बाद व्हायचा. तेव्हा त्याने एका कसोटीत ऑफ स्टम्पबाहेर बॅट घालायची नाही, फटका मारायचा नाही असा निर्धार केला. त्या कसोटीत त्याने द्विशतक ठोकले पण सारे फटके ऑन साईडलाच मारले. ऑफ साईडला एकही फटका मारला नाही.

सचिनचा हा धडा कोहली का घेत नाही? कर्णधार रोहित शर्माही कमालीचा अपयशी ठरला. झटपट फटके मारण्याच्या नादात तो अनेक वेळा बाद झाला. बुजुर्ग खेळाडू वारंवार अपयशी ठरत आहेत त्याचे मुख्य कारण म्हणजे ते देशांतर्गत क्रिकेट खेळणे टाळत आहेत. लाल चेंडूविरुद्ध खेळण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली पाहिजे. मग एखादा खेळाडू कितीका मोठा असेना. मागे इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटीत विक्रमवीर सुनील गावस्करने द्विशतक ठोकले होते. या कसोटीनंतर भारतीय संघ उशिरा रात्री भारतात परतला. परंतु दुस-या दिवशी सकाळी गावस्कर सरावासाठी नेटमध्ये हजर होता. आदल्या दिवशी द्विशतक ठोकणा-या गावस्करला दुस-या दिवशी नेट प्रॅक्टिसला हजर राहण्याची काय गरज होती? सचिन-सुनीलसारख्या महान खेळाडूंचे पाय कायम जमिनीवर होते. त्यांनी आयुष्यभर शिस्तीचे पालन केले म्हणून हे खेळाडू अढळपदाला पोहोचले. रोहित शर्मा-विराट कोहली या खेळाडूंनी हे लक्षात घेतले पाहिजे. नाहीतर त्यांची जागा घ्यायला युवा खेळाडू तयार आहेत. नितीश कुमारचे भवितव्य उज्ज्वल आहे,

त्याला फलंदाजीत बढती द्यायला हवी. त्याने शतक ठोकलेल्या कसोटीत त्याची ‘झुकेगा नही साला…’ची जिद्द आणि शतक झळकल्यानंतर अभिनेता प्रभासची अदाकारी लुभावणारी होती. भविष्यात बुमरा कर्दनकाळ ठरणार यात शंका नाही. परंतु त्याला दुस-या बाजूने समर्थ साथ मिळाली पाहिजे. बुमराच्या खांद्यावरील भार कमी करण्यासाठी अन्य गोलंदाजांनी तयार राहिले पाहिजे. घरच्या मैदानावर न्यूझिलंडने दिलेला ३-० असा मार आणि ऑस्ट्रेलियात ३-१ असा पराभव झाल्याने भारतीय संघ जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेपासून दूर गेला. पराभव झाल्याने सारे काही संपले असे नाही. अनेक युवा खेळाडू संघात येण्यासाठी धडपडत आहेत. ते भारताला पुन्हा कीर्तिशिखरावर पोहोचवतील!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR