वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारत आणि रशियाची मैत्री सर्वश्रुत आहे. रशियाने प्रत्येकवेळी भारताला मदत केली. आता जागतिक भू-राजकीय अस्थिरतेच्या काळात अमेरिकेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर यायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांचे भारताबद्दल एक धक्कादायक विधान समोर आले आहे. यामध्ये ते रशियाकडून शस्त्रे खरेदी करण्यास आणि भारत ब्रिक्सचा सदस्य असल्याबद्दल आक्षेप घेत आहेत.
भारताने नेहमीच अमेरिका आणि रशिया दोघांशीही चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला. तसेच, कोणत्याही दबावाशिवाय भारताने आपले हितसंबंध साधले आहेत. पण, यामुळेच अमेरिकेला त्रास होऊ लागला आहे. अमेरिकेच्या नाराजीचे खरे कारण रशियाकडून शस्त्रे खरेदी करणे असल्याचे मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन सतत भारतविरोधी विधाने करत आहे.
वॉशिंग्टन डीसी येथे एका मुलाखतीदरम्यान अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले, भारत सरकारने काही गोष्टी केल्या आहेत, ज्यांचा सामान्यत: अमेरिकेवर वाईट परिणाम होतो. उदाहरण देताना ते म्हणाले, तुम्ही सामान्यत: तुमची लष्करी उपकरणे रशियाकडून खरेदी करता. जर तुम्ही रशियाकडून तुमची शस्त्रे खरेदी करणार असाल, तर हा अमेरिकेला त्रास देण्याचा एक मार्ग आहे.