सलग दुस-यांदा जिंकला विश्वकप, क्रिकेटविश्वावर दबदबा
भारताची वादळी खेळी, धावांचा पाऊस,
अंतिम सामन्यात सर्वोच्च धावसंख्या
अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध तब्बल ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवित विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि क्रिकेट विश्वावर पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. विशेष म्हणजे सलग दोनवेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला. संजू, अभिषेक, ईशानच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २५६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करीत किवी संघाचा पराभव केला आणि टी-२० क्रिकेटच्या इतिहासात तिस-यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकत असा पराक्रम करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने आज प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची विक्रमी भागीदारी, ईशान किशनची जोरदार फटकेबाजी आणि अखेरच्या षटकात शिवम दुबेने केलेली धावांची बरसात यामुळे भारताने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून तब्बल २५५ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक मा-यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिस-यांदा टी-२० विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.
सलामीला संजू सॅमसनने सलग तिस-या सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने ४६ चेंडूंत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. संजू सॅमसनने अभिषेक शर्माच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची आणि ईशान किशनच्या साथीन दुस-या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करून न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळेच भारतीय डावाच्या आठव्या षटकात शतक आणि १५ व्या षटकात द्विशतक धावफलकावर लागले. पण जेम्स नीशामने १६ व्या षटकांत तीन फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या डावाला ब्रेक लावला.
त्याआधी अभिषेक शर्माने २१ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची तर ईशान किशनने २५ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके खेळून भारताला पाच बाद २५५ धावांचा पल्ला गाठून दिला.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी अचूक आणि घातक गोलंदाजी करत किवी फलंदाजांना बांधून ठेवले. नियमित अंतराने विकेटस घेत भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. दबावाखाली खेळणा-या न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी संपूर्ण संघ १५९ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवित पुन्हा एकदा क्रिकेटविश्वावर आपला दबदबा सिद्ध केला.
तिस-यांदा जिंकला
टी-२० वर्ल्ड कप
भारताने २००७ साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा हा किताब पटकावला. त्यानंतर २ वर्षांनी आता २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकत तिस-यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत एकमेव संघ ठरला.
पाचवेळा जिंकले
विश्वविजेतेपद
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ५ विश्वचषकांची नोंद झाली आहे. त्यामध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे दोन (१९८३ आणि २०११) आणि टी-२० विश्वचषकाचे तीन (२००७, २०४, २०२६) किताब जिंकले आहेत.
सलग २ वेळा जिंकला
टी-२० विश्वचषक
सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करत टीम इंडियाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद पुन्हा अधोरेखित केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय चाहत्यांना हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला. या विजयाने भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर क्रिकेटविश्वात नवा विक्रम प्रस्थापित केला.

