भुवनेश्वर : वृत्तसंस्था
कलिंगा स्टेडियमवर आयोजित ६५ व्या राष्ट्रीय आंतरराज्यीय वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम दिवशी भालाफेक स्पर्धेत रोहित यादवची चमक दिसून आली. रोहितने ८७.०५ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. यासोबतच, त्याने २०२६ च्या आशियाई खेळांसाठीही पात्रता मिळवली. रोहित यादवच्या नावे हा मोठा विक्रम प्रस्थापित झाला आहे. इतकेच नाही तर नीरज चोप्रानंतर तो असा विक्रम करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
रविवारी केलेल्या या कामगिरीमुळे, रोहित या हंगामातील भारताचा सर्वाधिक लांब भालाफेक करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच, श्रीलंकेच्या रमेश थरंगा पाथिरागे (९२.६२ मीटर) यांच्या पाठोपाठ, तो जगातील अव्वल भालाफेकपटूंच्या यादीत दुस-या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचाही समावेश आहे, जो ८५.६९ मीटरच्या कामगिरीसह चौथ्या स्थानावर आहे.
रोहितची कामगिरी विशेष आहे कारण त्याची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी ८३.०४ मीटर होती, जी त्याने २०२३ मध्ये केली होती. यावेळी, त्याने केवळ स्वत:चा वैयक्तिक विक्रमच मोडला नाही, तर ८४.३५ मीटरचा स्पर्धेचा विक्रमही सुधारला.
रोहितचे शानदार पुनरागमन
रोहित यादवची कामगिरीही दमदार होती. त्याने ७७.७१ मीटर, ७७.६३ मीटर, एक फाऊल (नो मार्क), ७७.५१ मीटर, ७९.४० मीटर आणि अंतिम प्रयत्नात ८७.०५ मीटर फेक केली. त्याने सांगितले की सुरुवातीला त्याला लय साधण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण अंतिम प्रयत्नात त्याला लय सापडली आणि त्याने सर्वोत्तम कामगिरी केली.
















