बंगळुरू : वृत्तसंस्था
अभिनेते कमल हसन यांनी कन्नड आणि तमिळ भाषेबाबत एक विधान केले होते. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला. आता या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन यांना फटकारले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ चित्रपट येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होत आहे. त्यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च दरम्यान केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला आहे, असे त्यांनी म्हटले होते. यावरुन वाद निर्माण झाला आणि प्रकरण इतके वाढले की, ते न्यायालयात पोहोचले.
कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने अभिनेत्याला फटकारले आणि म्हटले की, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण भावना दुखावण्याचा नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकत नाही. आम्ही आता ते तुमच्यावर सोडत आहोत. जर तुम्ही कोणाला दुखावले असेल, तर माफी मागा. कर्नाटकातून करोडो कमवता येतात. जर तुम्हाला कन्नड लोकांची गरज नसेल, तर येथून कमावणे थांबवा, अशा शब्दात न्यायालयाने त्यांना फटकारले. दरम्यान, कमल हासन यांनी या प्रकरणावर माफी मागण्यास नकार दिला. ते म्हणाले की, त्यांचे हे विधान एकता वाढवण्याच्या उद्देशाने दिले गेले आहे.