नांदेड : प्रतिनिधी
नांदेड-नागपूर महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील स्कार्पिओ गाडीने एका पादचा-याला उडवले आहे. त्यानंतर अनियंत्रित झालेली स्कार्पिओ गाडी पलटी होऊन आणि दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकला जोरदार धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की घटनेनंतर दोघांचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
अर्धापूरहून नांदेडच्या दिशेने स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगाने जात होती. या गाडीत सहा जण होते. पिंपळगाव पाटी जवळ रस्ता ओलांडून जात असताना एका व्यक्तीला स्कॉर्पिओने धडक दिली. त्यानंतर वाहन चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी होऊन डिव्हाईडरला ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि नांदेडहून अर्धापूरकडे जाणा-या ट्रकवर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर गाडीमध्ये असलेले सहाही जण गाडीखाली दबले गेले. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेने त्यांना तात्काळ नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सय्यद हुजैफ (३२) आणि शेख सलाम (३०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही नांदेड शहरातील पाकीजानगर येथील रहिवासी होते.