30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeसंपादकीयभीषण वायू प्रदूषण!

भीषण वायू प्रदूषण!

माणसाचे जगणे वरचेवर कठीण होत चालले आहे. विविध समस्यांना तोंड देत त्याला जीवन कंठावे लागत आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात याचा त्याला फटका बसतोच, त्यात काही वर्षांपासून वायू प्रदुषणाचा समावेश झाला आहे त्यामुळे माणसाला श्वास घेणे मुश्कील झाले आहे पर्यायाने श्वास सोडावे लागत आहेत. अर्थात याला बव्हंशी माणसाचे कर्तृत्वही कारणीभूत आहे. निसर्गावर आक्रमणाचा प्रयत्न झाला की उलट तडाखा बसणारच! झपाट्याने वाढत चाललेल्या वायू प्रदुषणाचा जोर का झटका भारतासह संपूर्ण जगाला बसला आहे, बसतो आहे.

भीषण वायू प्रदुषणामुळे २०२१ साली जगभरात ८१ लाख लोकांचा बळी गेला. त्यात भारतातील २१ लाख तर चीनमधील २३ लाख बळींचा समावेश आहे. अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्युटने ‘युनिसेफ’सोबत या संबंधीचा अहवाल तयार केला असून तो १९ जून रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये वायू प्रदुषणामुळे भारतात ५ वर्षाखालील सुमारे १ लाख ६९ हजार मुलांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ नायजेरिया १ लाख १४ हजार, पाकिस्तान ६८ हजार, इथियोपिया ३१ हजार, बांगला देश १९ हजार असा क्रम लागतो. दक्षिण आशियातील बहुतांश मृत्यूंसाठी उच्च रक्तदाब, चुकीचा आहार आणि तंबाखू सेवन या नंतर वायू प्रदूषण हाच घटक प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये वायू प्रदुषणामुळे झालेले मृत्यू हे त्या आधीच्या कोणत्याही वर्षी झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक होते.

वायू प्रदुषणामुळे जगभरात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये ५४ टक्के वाटा हा भारत आणि चीनचा आहे. वायू प्रदुषणामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हृदयरोगाचा आणि मृत्यूचा धोका वाढण्याचा इशारा अहवालात देण्यात आला आहे. २००० ते २०२३ दरम्यान ८ संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाले. त्यात वायू प्रदुषणाचा हृदयविकार, स्ट्रोक आणि कर्करोग यासारख्या आजारांवर होणा-या थेट दुष्परिणामाचा अभ्यास करण्यात आला होता. अभ्यासासाठी सुमारे १ कोटी लोकांच्या आरोग्याचा आढावा घेण्यात आला होता. वायू प्रदुषणाचा व्यापक परिणाम हा हृदयाशी संबंधित आजारावर होत असतो, असे अभ्यासकांनी म्हटले आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांत एकत्रितपणे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे एकूण मृत्यूच्या ५४ टक्के आहे. दक्षिण आशियामधील पाकिस्तान सुमारे २ लाख ५६ हजार, बांगला देश २ लाख ३६ हजार, म्यानमार १ लाख १ हजार तर आग्नेय आशियातील इंडोनेशिया २ लाख २१ हजार, व्हिएतनाम ९९ हजार, फिलिपाईन्स ९८ हजार या देशांचा समावेश होतो. या शिवाय आफ्रिका खंडातील नायजेरियामध्ये २ लाख ६ हजार तर इजिप्तमध्ये १ लाख १६ हजार मृत्यू झाले आहेत.

ओझोनमुळे होणारे एकूण प्रदूषण सुमारे ८१ लाख मृत्यूस कारणीभूत ठरले आहे. जगभरात वायू प्रदुषणामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ९० टक्के मृत्यू हे वायू प्रदुषणामुळे झाले आहेत. वायू प्रदुषणाचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. म्हणून हवेची गुणवत्ता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. नुकताच जागतिक योग दिन पाळण्यात आला. उत्तम आरोग्यासाठी योगासने कशी महत्त्वाची आहेत हे भारतातर्फे जगाला पटवून दिले जात असतानाच भारतातच याच्या विपरित परिस्थिती कशी आहे याचे चित्रही समोर आले. २०२१ मध्ये प्रदुषित हवेमुळे भारतात २१ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी अमेरिकेतील ‘हेल्थ इफेक्ट’ संस्थेने आपल्या अहवालाद्वारे मांडली. वर्षभरामध्ये जर वायू प्रदुषणामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत असतील तर याची कल्पना भारत सरकार आणि राज्य सरकारांना, आरोग्य विभागाला नसेल का? भारतात वायू प्रदूषण हे प्रचंड प्रमाणात आहे हे नाकारण्यास जागाच नाही. म्हणजे ज्या योगासनांचा आपण आग्रह धरतो त्याच देशात प्राणायाम करण्यासाठी शुद्ध हवा मिळत नसेल तर ही परिस्थिती अत्यंत केविलवाणीच म्हणावी लागेल.

अहवालात म्हटले आहे की, खराब हवामानामुळे भारतात रोज ४६४ किशोरवयीन मुले दगावतात. जगण्यासाठी शुद्ध हवा आवश्यक असते तीच नसेल तर बाकीच्या इतक्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या अशा बढाया मारण्यात काय अर्थ? अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या जगण्यासाठी मुलभूत गरजा मानल्या जातात; परंतु या गोष्टींच्या अस्तित्वासाठी शुद्ध हवा ही अधिक मुलभूत गरज ठरते. भारतात हवेतील प्रदूषण निर्माण होण्यामागे सर्वांधिक वाटा हा वाहतुकीचा आहे. सुमारे १९.६ टक्के वायू प्रदूषण हे वाहनातून बाहेर पडणा-या धुरामुळे होते शिवाय रस्त्यावरच्या धुलीकणांचीही त्यात भर पडते. हे प्रमाण १९.४ टक्के आहे. औद्योगिकरणाच्या माध्यमातून १८.९ टक्क्यांची भर पडते. असाध्य रोग वाढण्यामागे वायू प्रदूषणच कारणीभूत आहे.

मधुमेह, नेत्रविकार जडण्यामागे प्रदुषित हवाच कारणीभूत असल्याचे अहवालात म्हटले आहे म्हणून सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू ही महानगरे वायू प्रदुषणासाठी प्रसिद्ध आहेत. दिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्याने राजधानीतील प्रदूषण इतके वाढले की शाळांना सुटी द्यावी लागली. मास्क लावल्याशिवाय लोकांना फिरता येत नव्हते. यावरून परिस्थिती किती चिंताजनक आहे हे लक्षात येते; पण लक्षात कोण घेतो? वायू प्रदूषण हे स्लो पॉयझनिंग सारखे होत राहते. ज्या वेळी हे लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. भारतात मोठी लोकसंख्या असल्याने मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाणही मोठे आहे. निसर्गसंपदेने समृद्ध असलेल्या भारतात प्रदुषित हवेचे जीवघेणे तांडव सुरू राहावे हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण प्रदुषणाला आमंत्रण देणारे ठरत आहे. औद्योगिकरण, वाहनांचे वाढते प्रमाण, मोकळ्या मैदानांचा -हास, निसर्गसंपदेचा -हास वायू प्रदूषणाला हातभार लावत आहेत. श्वास घ्यायला शुद्ध हवाच शिल्लक नाही!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR