26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्रभुजबळांविरुद्ध कोर्टात जाणार

भुजबळांविरुद्ध कोर्टात जाणार

अंजली दमानिया यांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ््यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली भूमिका मांडली. छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना कुठलीही क्लीनचीट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले. तसेच छगन भुजबळ यांना मागच्या आणि आताच्या दोन्ही सरकारने वाचवले आहे. फडणवीस भ्रष्टाचा-यांना घेऊन पुढे जात आहेत, असा गंभीर आरोपही दमानिया यांनी केला.

सक्तवसुली संचालनालय भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा तपास करत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी कोणतीही निविदा न मागवता के. एस. चामणकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिले, असा आरोप करण्यात आला होता. छगन भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. मात्र, अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रकरणावर आणि निर्णयावर भाष्य केले आहे.

छगन भुजबळांविरुद्ध २१४ ला जनहित याचिका दाखल केल्यापासून माझा लढा सुरू आहे. एकूण ११ घोटाळे आणि त्यातून मिळणारे पैसे यासंदर्भात आम्ही जनहित याचिका दाखल केली होती. तीन गुन्हे दाखल झाले, आतापर्यंत दोन गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला आहे, एक गुन्हा बाकी आहे. कोर्टाला योग्य ती माहिती न दिल्याने गुन्हे रद्द केले असतील, मी मुख्य न्यायमूर्तींकडे यासंदर्भात पत्र लिहिणार आहे. कलिना सेंट्रल लायब्ररीचे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे छगन भुजबळांना क्लीनचीट नाही, असे म्हणत आपण उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले.

आता देशाच्या सरन्यायाधीश न्यायवृंद तसेच मुख्यमंत्र्यांना देखील मी पत्र लिहिणार आहे. मी या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार आहे. एसीबीने अपील करणे अपेक्षित होते. मात्र सगळे एका माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे सरकारने ३१ मार्च २०२२ ला शासन निर्णय रद्द करण्यासाठी दुसरा शासन निर्णय काढला. एप्रिल २०२३ मध्ये पुन्हा एक शासन निर्णय काढून अपिलमध्ये जाण्याचा शासन निर्णय काढला. मात्र, महाराष्ट्र सदन घोटाळ््याचे प्रकरण अद्याप संपले नाही. सगळ््या सरकारांनी त्यांना वाचवले. आधी ठाकरेंनी वाचवले, मग फडणवीसांनी वाचवले, असे म्हणत अंजली दमानियांनी दोन्ही सरकार भुजबळांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे.

फडणवीस सर्व भ्रष्टांना
पुढे घेऊन जात आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, सगळे घोटाळे हे देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आहेत. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. ईडीच्या आरोपपत्राचे सगळे पुरावे आहेत, प्रत्येकाचा जबाब दिला आहे, तरी असा निर्णय आला हे दुर्दैव आहे. भाजपची ही मोडस ऑपरेंडी आहे, आधी आरोप करा त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावा आणि त्यांना पक्षात घ्या. फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा दिला होता आणि आज हेच फडणवीस सगळ््या भ्रष्टाचा-यांना घेऊन पुढे जात आहेत, असा घणाघात दमानिया यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR