मुंबई : प्रतिनिधी
ध्वनिप्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे भोंग्याची परवानगी वापरली, तर हक्कांचे उल्लंघन झाल्याचा दावा कोणीही करू शकत नाही. उलट परवानगी नाकारणे हे सार्वजनिक हिताचेच आहे, असे सांगत उच्च न्यायालयाने भोंग्यासंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला. या निकालाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले.
मशिदी आणि मदरशांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई करण्याबद्दल मु्ंबई पोलीस उदासीन आहेत, असा आरोप कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातील नेहरू नगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन आणि शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण असोसिएशन लिमिटेड या दोन संघटनांनी केला होता. प्रकरणावरील सुनावणी अंती प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनांसाठी ध्वनिक्षेपकाचा (लाऊड स्पीकर, भोंगा) वापर करणे, हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही, असे सांगत न्यायालयाने पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
प्रार्थनेसाठी भोंगे वापरणे म्हणजे धार्मिकता नव्हे असा स्वच्छ निकाल माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. याबद्दल माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून अभिनंदन. मशिदींवरचे कर्णकर्कश्श भोंगे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास याबद्दल राज ठाकरे गेली अनेक वर्ष बोलत आहेत, असे म्हणत मनसेने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.