28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeसंपादकीय विशेषमंत्रमुग्ध स्वरयात्रीचा अलविदा

मंत्रमुग्ध स्वरयात्रीचा अलविदा

भारतीय गानसंगीताच्या परंपरेला प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील काही घराण्यांनी या क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवला आहे. आपापल्या घराण्याची गायकी पुढे नेताना त्या चौकटीपलीकडचा स्वरावकाश शोधण्याचे भान ज्या मोजक्या गायकांना होते, त्यात राशिद खान अग्रणी होते. उस्ताद राशिद खान हे हिंदुस्थानी गायनाच्या रामपूर-सहस्वान घराण्याचे एक प्रमुख गायक होते. त्यांनी त्यांचे ग्वाल्हेरचे काका उस्ताद गुलाम मुस्तफा खान आणि घराण्याचे खलिफा (प्रमुख) उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. संगीताचा लाभलेला वारसा, काळजाला भिडणारा आवाज आणि जन्मजात प्रतिभा यांच्या साहाय्याने राशिद खान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील समकालीन आघाडीच्या गायकांपैकी एक बनले.

हिंदुस्थानी गायनाचे प्रणेते असणा-या, स्वरभास्कर दिवंगत पंडित भीमसेन जोशी यांनी एकदा राशिद खान यांची बंदीश ऐकून असे म्हटले होते की, राशिद खानच्या हातात हिंदुस्थानी संगीताचे भविष्य सुरक्षित आहे. भीमसेनजींच्या या प्रशंसेमधून राशिद खान यांच्या सूरांची मोहिनी किती प्रभावी होती हे लक्षात येते. राग मुलतानीमधील प्रसिद्ध द्रुत ख्यालमधील त्यांचे तेजस्वी गायन नैनन में आन बंद, कौनसी परी रे यांसारख्या गाण्यांमुळे उस्ताद राशिद खान हे महान गायक म्हणून स्मरणात राहतील.
राशिद खान यांनी केवळ ख्याल म्हणून ओळखल्या जाणा-या हिंदुस्थानी गायनाच्या गंभीर सादरीकरणातच नव्हे तर ठुमरी म्हणून ओळखल्या जाणा-या शास्त्रीय प्रकारातही उत्कृष्ट सादरीकरण करून आपल्यातील चतुरस्रता दाखवून दिली. कोणत्याही गायकाने सादर केलेल्या गाण्याचे मूल्यमापन ते गाणे रसिकांच्या मनात किती काळ घर करून राहते, ते सातत्याने गुणगुणले जाते का यावरून केले जाते. या निकषावर राशिद खान यांच्या गायनाकडे पाहिले असता त्यांचे कोणतेही सादरीकरण आपण एकदा ऐकले की विसरूच शकणार नाही, असे होते.

राशिद खान यांना त्यांचे काका पहिल्यांदा मुंबईला घेऊन गेले. तेथे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. नंतरच्या काळात उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी ते कोलकात्यात आयटीसी म्युझिक रिसर्च अकादमीमध्ये दाखल झाले. ‘तराना गायना’मध्ये पारंगत मानले जाणारे उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी गायनाचे बारकावे शिकले होते. शास्त्रीय गायनाच्या मैफिलींमध्ये राशिद खान जेव्हा सूर छेडत तेव्हा समोर उपस्थित असणारे श्रोते अक्षरश: मंत्रमुग्ध होत असत.आज लाखो संगीतरसिकांचे प्रेम लाभलेल्या राशिद खान यांना संगीतात फारसा रस नव्हता असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; मात्र, त्यांना सुरुवातीच्या काळात क्रिकेटमध्ये रस होता आणि त्यांना गायक नव्हे तर क्रिकेटर व्हायचे होते, ही वस्तुस्थिती आहे. पण ते त्यांच्या घराण्याच्या परंपरांपासून फार काळ दूर राहू शकले नाहीत आणि हळूहळू त्यांची संगीताची आवड वाढू लागली. एकरूपता, तल्लीनता, समर्पण भाव आणि त्याला लाभलेली सरावाची जोड याद्वारे त्यांनी संगीताच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बडे गुलाम अली खाँसाहेबांनी गायिलेल्या ‘याद पिया की आए’ या गीताने अनेक गायकांना आव्हान दिले. मात्र, राशिद खान यांनी गायिलेले रूप अनेकांना खाँसाहेबांच्या मूळ गायकीच्या जवळचे वाटले.

गानसंगीताच्या चाहत्यांमध्ये दोन प्रमुख वर्ग आहेत. एक गट शास्त्रीय संगीताचा चाहता आहे; तर दुसरा गट शास्त्रीयेतर म्हणजे सिनेसंंगीताचा, भावगीतांचा चाहता आहे. तरुणपिढीमध्ये शास्त्रीय गायनाबाबत फारशी रुची दिसत नसली तरी राशिद खान त्यांच्या परिचयाचे आहेत. याचे कारण ‘हम दिल दे चुके सनम’मधील ‘अलबेला सजन आयो रे’ आणि ‘जब वी मेट’मधील ‘आओगे जब तुम ओ साजना’ या गाण्यांनी तरुणपिढी अक्षरश: घायाळ झाली. पुण्यामध्ये पार पडणा-या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’सह विविध संगीत महोत्सव त्यांच्या दमदार, कसदार गायकीने अंतर्बा बहरून गेलेले रसिक त्यांच्या निधनाच्या वार्तेने मनापासून हळहळले. तीन वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रीय संगीतकार वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ हा चरित्रात्मक मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. या चित्रपटात राशिद खान यांनी गायलेला मारवा ऐकताना देहभान विसरायला होते.

उस्ताद राशिद खान यांच्यावर उस्ताद आमिर खाँ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीचा प्रभाव होता. त्यांच्या गाणे म्हणण्याच्या शैलीत हा प्रभाव जाणवत असे. एका मुलाखतीत त्यांनी भीमसेनजींची खास आठवण सांगितली होती. मला साक्षात पंडितजींसह गाणं म्हणायची संधी मिळाली. आमची जुगलबंदी चांगलीच रंगली होती. ही जुगलबंदी झाल्यानंतर पंडितजींनी माझं कौतुक केलं होतं. तसेच साता-याहून माझ्यासाठी खास विड्याची पाने ते पाठवायचे. ‘माय नेम इज खान’ या चित्रपटातील ‘अल्लाह ही रहेम, यासह ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटात ‘तू बन जा गली संग’ अशी गाणी त्यांनी गायली आहेत.

-अमृता साठे,
शास्त्रीय गायिका

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR