मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल अंधविश्वास आणि तंत्र-मंत्राची जोरदार चर्चा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातही यावर टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्यावर कडाडून टीका केली आहे. ठाकरे म्हणतात, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्या यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व. यात वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा देखील समाचार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील अघोरी विद्येचे जनक एकनाथ मिंधे यांनी त्यांच्या गटाच्या तिस-या वर्धापनदिनी भाषण केले. भाषण मुडद्यांसमोर केले, असे सांगतानाच ठाकरे म्हणतात की, हे मुडदेही रोजंदारीवर विकत आणले होते. अघोरी विद्या आणि मुडद्यांचा संबंध असल्याने त्यांनी या मुडद्यांत प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. तर, मंचावरील उपस्थित काही सांगाड्यांनी गाडलेले मुडदे उकरण्याचा प्रयोग केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दोनच दिवसांपूर्वी मिंधे गटातले एक मंत्री गोगावले यांचे अघोरी पूजा करतानाचे ‘चित्रण’ महाराष्ट्रासमोर आले आहे. या चित्रणात कमरेवर वीतभर टॉवेल सोडला तर मंत्रिमहोदय संपूर्ण उघडेबंब बसले आहेत. आजूबाजूला मानवी कवटी, हाडे, लिंबू, मिरच्या व पूजापाठ करणारे अघोरी बाबा बसले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राचे ज्यांनी हे असे स्मशान आणि कब्रस्तान केले, ते मिंधे लोक त्यांच्या रोजच्या जीवनातही मारण्या-मरण्याच्या गोष्टी करत असतील तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.
वर्धापनदिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या बेइमानांना आव्हान दिले की, ‘‘तुम्ही शिवसेना संपवायचं स्वप्न पाहिलंत तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. शिवसेना आणि ठाकरे ब्रॅण्ड या लोकांना संपवता येणार नाही. मी ठामपणे लढायला उभा आहे. हिंमत असेल तर माझ्यावर चाल करून या, पण येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या.’’ ही आव्हानाची भाषा सर्वच महाराष्ट्रद्रोह्यांसाठी होती. यावर मिंधे यांच्या बुडाला सगळ्यात जास्त आग लागली, असे ठाकरे म्हणतात. मिंधे म्हणाले, ‘‘मेलेल्यांना मारून काय मिळणार? ते आधीच मेले आहेत.’’ एकनाथ मिंधे यांची ही मरण्या-मारण्याची भाषा म्हणजे त्यांच्या सध्याच्या मानसिक अवस्थेचे दर्शन आहे.
महाराष्ट्राची तिजोरी लुटणे आणि लाचारीचा कळस गाठून दिल्लीची हुजरेगिरी करणे हेच या मिंध्यांचे काम बनले आहे. पुन्हा विरंगुळा म्हणून ‘अघोरी’ विद्येचे बलप्रयोग सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणास स्मशानकळा आणण्याचे श्रेय या महाशयांना नक्कीच द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कधी नव्हे ते लिंबू, मिरच्या, टाचण्या, कवट्या यांना महत्त्व आले. हे मिंधे यांचे कर्तृत्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मिंधे यांचे स्वत:चे असे काहीच नाही.