जिरीबाम : मणिपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या जिरीबाममध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफने ११ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत सीआरपीएफचा दोन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. सीआरपीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरु झाली होती. या चकमकीत आतापर्यंत ११ कुकी अतिरेकी ठार झाले आहेत.
सोमवारी मणिपूरमधील जिरीबाममध्ये सुरक्षा दल आणि कुकी अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक झाली. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात किमान ११ संशयित कुकी अतिरेकी ठार झाले आहेत. आसामच्या सीमेला लागून असलेल्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित कुकी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा पोलिस ठाण्यावर आज दुपारी अडीच वाजता संशयित अतिरेक्यांनी हल्ला केला होता. अतिरेक्यांच्या बाजूने सीआरपीएफच्या पथकावर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. संशयित कुकी अतिरेक्यांनी पोलिस ठाण्यावर दोन्ही बाजूंनी हल्ला केल्यानंतर चकमक सुरू झाली. सीआरपीएफच्या पथकाने केलेल्या कारवाईत ११ संशयित अतिकेरी ठार झाले आहेत.
या पोलिस ठाण्याजवळ विस्थापितांसाठी मदत शिबिरही आहे. या मदत शिबिराला लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा कट होता. जिरीबाममधील बोरोबारका पोलीस ठाण्याला अलीकडच्या काही महिन्यांत अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांतर सोमवारी पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. बोरोबेकरा पोलिस ठाण्यांतर्गत जाकुराधोर येथेही अतिरेक्यांनी तीन ते चार घरे जाळली आहेत.