इंफाळ : वृत्तसंस्था
मणिपूरमध्ये दोन वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीला अतिरेक्यांकडून पोलीस कर्मचा-यांची शस्त्रे लुटण्यात आली होती. सुरक्षा दलाकडून अद्यापही ती परत मिळवण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. शस्त्रांसोबत सापडलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड कम्युनिकेशन डिव्हाईसमुळे सुरक्षा दलाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, स्टारलिंकचे मालक असणा-या एलॉन मस्क यांनी याबाबत खुलासा केला आहे.
मणिपूरच्या संघर्षग्रस्त भागातून भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सला घुसखोरांच्या तळावरून एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारलिंकचे इंटरनेट डिव्हाईस सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा, लष्कर आणि पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. अनेक जिल्ह्यांत ही उपकरणे सापडली आहेत. एके ठिकाणी सुरक्षा दलाने झडतीदरम्यान एक रिसीव्हर, २० मीटर लांबीची केबल आणि एक राउटर जप्त केला आहे.
स्टारलिंक कोणत्याही दुर्गम भागात वायर किंवा टॉवरशिवाय इंटरनेट सुविधा पुरवते. यामुळे इंटरनेट थेट सॅटेलाईवरून उपलब्ध आहे. ते एनक्रिप्टेड असून हॅक करणे कठीण आहे. मणिपूरमध्ये सापडलेल्या डिव्हाईसवर रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट लिहीलेले आहे. हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सशस्त्र गट सध्या मणिपूरमधील सर्वात सक्रिय दहशतवादी गट आहे. मणिपूरमधील घुसखोरांकडे हे डिव्हाईस कुठून आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण स्टारलिंकला अद्याप भारतात ब्रॉडबँड परवाना मिळालेला नाही.
दरम्यान, मणिपूरमध्ये स्टारलिंकसारखे डिव्हाईस सापडल्यानंतर एलॉन मस्क यांचे मोठे विधान समोर आले आहे. भारतावरील स्टारलिंक सॅटेलाइट बीम बंद करण्यात आले आहेत, असे मस्क यांनी म्हटले. आपले डिव्हाईस अशांत मणिपूरमध्ये वापरले जात असल्याचे सर्व दावे मस्क यांनी फेटाळून लावले.