लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत दि. १० मार्च रोजी महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. या सभेत महानगरपालिका प्रशासनाला सभागृहाने जबरदस्त दणका देत प्रशासकीय कालावधीत सन २०२५-२६ मधील जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजूर कामांची चौकशी जिल्हा नियोजन समितीने करावी व चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
सर्वसाधारण सभेच्या पिठासीन अधिकारी महापौर जयश्री सोनकांबळे होत्या. मंचावर उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, आयुक्त श्रीमती मानसी व नगर सचिव अश्विनी देवडे यांची तर सभागृहात काँग्रेस-वंचित बहुजन आधाडी, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचा दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सभेस सुरुवात झाली. सभा विशेष सर्वसाधारण आहे की, सर्वसाधारण सभा आहे. विशेष सर्वसाधारण सभा असेल तर विषय पत्रिकेवरील विषय या सभेत ठेवता येतात काय? यावरच प्रारंभीचा सुमारे दीड तास गेला. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांना सुरुवात झाली. मागील सभेचे इतिवृत्त कार्य करुन सभागृहनेता, विरोधीपक्ष नेता, स्थायी समिती सदस्यांची निवड, परिवहन समिती सदस्यांची निवड, महिला व बालकल्याण विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात आली.
आजच्या सभेत सर्वात महत्वाचा विषय होता तो विषय क्रमांक ११. या विषयावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. प्रशासकीय कालावधीत सन २०२५-२६ मधील जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मंजुर कामांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार होता. परंतू, सभागृहात जेव्हा हा विषय आला तेव्हा या विषयावर चर्चा झाली. या सर्व विषयाची चौकशी जिल्हा नियोजन समितीने करावी व चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत या विषयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला जबरदस्त धक्का बसला. त्यानंतर शहरातील स्व. शिवराज पाटील चाकुरकर यांचे स्मारक उभारणी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेउकर यांचा ७५ फुट उंचीचा पुतळा उभारणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क पुनर्विकास, महानगरपालिकेची सिटी बससेवा, वाहतूक व्यवस्थापन, होर्डीग व युनिपोल धोरण, विलासराव देशमुख पार्क सद्य:स्थिती या विषयांवर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती.

