मुंबई : प्रतिनिधी
मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापा-यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, अशा चिंतेतून व्यापा-यांनी स्वत:च्या सुरक्षेच्या मुद्यावर एकजूट दाखवत हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
या पार्श्वभूमीवर सेवेन स्कूल, मीरा रोड (पूर्व) येथून पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत एक भव्य निषेध रॅली काढण्यात येणार आहे. या घटनेच्या अनुषंगाने व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत व्यापा-यांनी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण असले तरी व्यापा-यांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आता मनसेचे नेते अविनाश जाधव हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत अविनाश जाधव काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनसेने या प्रकरणात आणखी आक्रमक भूमिका घेतल्यास मीरा-भाईंदरमध्ये मनसे विरुद्ध व्यापारी हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरून मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकानमालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकानमालकाच्या कानाखाली जाळ काढला.