मुंबई : वृत्तसंस्था
अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक’ या नव्या मराठी चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या नावावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पुण्यासह राज्यातील विविध भागात हा चित्रपट बंद पाडला आहे. त्यामुळे मृण्मयी आणि ‘मना’चे श्लोक’च्या टीमने सध्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मना’चे श्लोक’ हे नाव ऐकून अनेकांना प्रसिद्ध संत रामदास स्वामींच्या ग्रंथाची आठवण येते. या पार्श्वभूमीवर काही हिंदू संघटनांनी या चित्रपटाच्या नावाला विरोध दर्शवला आहे. त्यांचा आरोप आहे की, चित्रपटात धार्मिक विषय किंवा रामदास स्वामींचा संदर्भ नसून प्रेमकथेवर आधारित आहे. या पवित्र ग्रंथाच्या नावाचा चुकीचा वापर केल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी आंदोलनही झाले असून चित्रपटाचे पोस्टर हटवण्याची मागणी करण्यात आली. तसेच पुण्यात प्रदर्शनावर बंदी देखील घालण्यात आली.
‘मना’चे श्लोक’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरिश दुधाडे इत्यादी कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेने केले आहे. या चित्रपटातील मुख्य पात्रांची नावे ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ अशी आहेत. त्यामुळे ‘मना’चे श्लोक’ हे नाव ठेवण्यात आले होते.
मृण्मयी देशपांडेंची प्रतिक्रिया
या वादावर मृण्मयी देशपांडेंनी शांतपणे भूमिका मांडली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘नमस्कार! ‘मना’चे श्लोक’ या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्मि महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दु:खद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात!